अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना काल गुरुवारी रात्री बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावात घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या युवकाचे नाव महांतेश रुद्रप्पा करलिंगणावर (वय 23, रा मारीहाळ) असे आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी पूर्ववैमानस्यातून महांतेशची हत्या करण्यात आली असावी असा कयास आहे.
अज्ञात चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने वार करण्याबरोबरच भोसकल्यामुळे महांतेश कर्लिंगनावर घटनास्थळीच मृत झाला. खुनाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या डीसीपी पी व्ही स्नेहा आणि मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी मारीहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. खुनाच्या या घटनेमुळे संपूर्ण मारीहाळ गाव हादरले आहे.
गेल्या चार महिन्याच्या कालावधीत बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात विशेषता शिंदोळी सुळेभावी आणि मारीहाळ या गावातून खुनाच्या घटना घडल्या होत्या आजच्या घटनेने त्यात पुन्हा वाढ झाली आहे.