मनात प्रचंड जिद्द, आत्मविश्वास असण्याबरोबरच परिश्रम घेण्याची तयारी असेल तर उराशी बाळगलेले स्वप्न साकारता आले नसले तरी त्यापेक्षाही नवे सुंदर स्वप्न साकारता येऊ शकते हे जाफरवाडी येथील 26 वर्षीय निकिता वैजू पाटील या शेतकरी कुटुंबातील युवतीने दाखवून दिले आहे. परिस्थितीमुळे चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न बाजूला सारून ती आज शास्त्रोक्त पद्धतीने शेती करत प्रगतशील शेतकरी बनली आहे. युवा पिढीसाठी आदर्श ठरलेली निकिता मिरची उत्पादनात लाखो रुपये कमावते.
जाफरवाडी येथील निकिता वैजू पाटील ही चार्टर्ड अकाऊंट (सीए) होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र अभ्यास करत असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची तसेच पिढीजात शेती व्यवसाय पुढील पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी निकिताच्या तरुण खांद्यावर पडली. मात्र डगमगून न जाता आपल्या सीएच्या स्वप्नांना मुरड घालत तिने वडीलार्जीत शेतीचा कायापालट करण्यास सुरुवात केली.
आजच्या जमान्यात जिथे शेती म्हणजे नाक मुरडली जाते तिथे मिरची सारख्या हंगामी पिकातून ती महिन्याला लाखो रुपये कमवून परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. शेतात कष्ट केले, भूमातेची सेवा केली तर तिचा वरदहस्त आपल्यावर कायम राहतो असे मानणारी निकिता ही एक आदर्श युवा शेतकरी ठरली आहे.
गेल्या वर्षी निकिताचे वडील वैजू पाटील यांनी कांही कारणास्तव राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि पाटील कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. कर्ता पुरुष नाहीसा झाल्यामुळे 4 एकर शेत जमीन कसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी निकिता बेळगावच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयातून बी.कॉम पूर्ण करून भरतेश महाविद्यालयात सीएचा अभ्यासक्रम शिकत होती.
सीए बनून बंगळूर किंवा पुण्यातला कंपनीत काम करण्याची तिची इच्छा होती. मात्र वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे निकिताच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. वृद्ध आई अंजना पाटील आणि मोठा भाऊ अभिषेक यांना शेतीतून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र वडिलांबरोबर राहून शेतीचे ज्ञान प्राप्त केलेल्या निकिताने त्यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यात आपला अभ्यास अर्धवट सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. निकिताच्या या निर्णयाने कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. वयात आलेली आपली मुलगी शेतीच्या कामात कशी गुंतणार? याची चिंता त्यांना सतावत होती. तथापी निकिताने आपली जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांना आश्चर्य चकित केले. शिक्षण सोडून ती पूर्णवेळ शेतकरी झाली.
लहानपणापासून शेतीची आवड असणाऱ्या निकिताने आपल्या वडिलांच्या चार एकर शेती पैकी एक एकरात मिरचीची रोपे लावली. रोपांची लागवड करताना तिने ठिबक सिंचन बसवले. पहिल्या काढणीच्या वेळी चार टनांहून अधिक मिरचीची काढणी झाली. 10 किलो मिरचीसाठी 500 रुपयांपर्यंत दर आहे. यातून लाखो रुपयांचा लाभ मिळाला.
महिन्याला 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आज तिच्या शेतात मिरची काढणीसाठी 10-15 महिला काम करतात. दर 10-12 दिवसांनी मिरची काढली जाते. एक एकर जमीन तीन भागांमध्ये विभागली असल्याने मिरचीचा एक भाग वाढण्यास 4-5 दिवस लागतात. झाडांची काळजी घेतल्यानंतर, पाणीपुरवठा आणि तण काढून टाकल्यानंतर, मिरची दुसऱ्या भागात 10-12 दिवसांनी पुन्हा काढली जाते. 35 ते 40 दिवसांत मिरची तीन वेळा काढली जाते. मिरचीच्या प्रत्येक तोड्याला 2 ते 2.30 लाख रुपये मिळतात. निकिता पिकवणाऱ्या मिरचीला मोठी मागणी आहे. 3 ते 5 इंच वाढणाऱ्या या मिरचीचा भावही जास्त आहे. मिरच्या 10 किलोच्या पिशवीत भरण्यात येतात. या मिरच्या गोवा आणि कोल्हापूर येथेही पाठवल्या जातात. खर्च वगळता आतापर्यंत निकिताला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
यशस्वी प्रगतिशील शेतकरी बनलेल्या निकिताला तिचा भाऊ अभिषेक आणि कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले आहे. काका तानाजी पाटील शेतीतील चांगल्या उत्पन्नासाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक सल्ला देत असतात.
एकीकडे मोठा भाऊ अभिषेक तर दुसरीकडे काका तानाजी यांच्या मार्गदर्शनाखाली निकिता शेतीत रमून गेल्याचे पहावयास मिळते. आज शेती करत असताना सीएचा अभ्यास अर्ध्यावर सोडला याचे मला फारसे दुःख वाटत नाही. मोठ्या शहरांत नोकरी करण्यापेक्षा हे चांगले आहे. शेतीमुळेच म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने मिरचीची लागवड करून मी माझ्या कुटुंबासाठी आज चांगले उत्पन्न मिळवत आहे, असे निकिता वैजू पाटील मोठ्या अभिमानाने सांगते.