रामनगर -गोवा मार्गावरील काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशासह कर्नाटकातील कोणत्याही वन्यजीव अभयारण्यातून प्रवास करणाऱ्या वाहनांना यापुढे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे अनमोड येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनधारकांकडून गेल्या बुधवारपासून प्रवेश शुल्क आकारले जात आहे.
राज्यातील व्याघ्र संरक्षित प्रदेश, राष्ट्रीय वन्यजीव उद्याने आणि अभयारण्य क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनधारकांकडून शुल्क वसूल करण्याचा आदेश बेंगलोर येथील प्रधान मुख्य वन संरक्षणाधिकाऱ्यांनी काढला आहे.
त्यानुसार रामनगर -गोवा या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना वनविभागाने प्रवेश शुल्क (वाइल्ड लाईफ एन्ट्री) लागू केले आहे. या ठिकाणच्या वनविभागाच्या अनमोड आंतरराज्य चेक पोस्टवर ही शुल्क आकारणी केली जात आहे.
वनविभागाने काढलेल्या आदेशानुसार अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना 50 रुपये प्रवेश शुल्क तर कारगाड्या वगैरे लघु वाहनांना 20 रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे. तथापि सरकारी वाहने, स्थानिकांची वाहने, सरकारी संस्थांची वाहने आणि रुग्णवाहिका यांना या शुल्कातून वगळण्यात आले आहे. गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील रामनगरपासून ते अनमोड पर्यंतचा रस्ता हा काळी व्याघ्र संरक्षित क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनधारकांकडून अनमोड येथे हे शुल्क वसूल करण्यात येत आहे.
या वसुलीसाठी काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशातील वाचेर म्हणून काम करणारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे बिलिंगसाठी तीन मशीन्स देण्यात आल्या आहेत. त्याद्वारे वाहनधारकांना रीतसर पावती देण्यात येत आहे.