नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगचे (एनआयओएस) प्रमाणपत्र खोटे -बोगस आढळून आल्यामुळे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल 51 विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे राज्य सरकारच्या तांत्रिक शिक्षण विभागाने संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अनुमती दिली होती. मात्र महाविद्यालय निहाय प्रवेशाला मंजुरी देत असताना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाला (व्हीटीयु) ‘त्या’ विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकारामागे फार मोठा घोटाळा असल्याचा आम्हाला दाट संशय आहे.
त्यामुळे यापूर्वीच्या प्रवेश प्रक्रियेची देखील चौकशी केली जाईल, असे व्हिटीयुचे उपकुलगुरू विद्याशंकर यांनी स्पष्ट केले आहे. आता गेल्या पाच वर्षांमध्ये एनआयओएस प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात आलेल्या प्रवेशांची व्हिटीयुकडून तपासणी केली जाणार असून त्या संबंधित राज्य सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगला लेखी माहिती दिली जाणार आहे.
व्हीटीयुच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत असताना त्यांनी जेंव्हा बारावीच्या गुणपत्रिकेचा क्यूआर कोड स्कॅन केला. त्यावेळी तो कोड एनआयओएसच्या खोट्या -बोगस वेबसाईटचा असल्याचे उघड झाल्याने त्यांना धक्काच बसला.
¢ज्या 51 विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आला आहे ते सर्वजण मॅनेजमेंट कोट्यातील असून त्यापैकी बहुतांश जण बेंगलोर मधील प्रतिष्ठित मोठ्या महाविद्यालयातील तर कांही तुमकुर आणि चिक्कबेळ्ळापूरच्या महाविद्यालयातील आहेत.