विधानसभेसाठी काल बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडून सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन बंद झाले आहे. आता येत्या शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे समस्त कार्यकर्ते व मतदारांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागून राहिले आहे.
मागील महिनाभरापासून निवडणूक रिंगणातील उमेदवार साम दाम दंड भेद या सर्व गोष्टींचा अवलंब करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. आता काल निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आधारावर उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते समर्थक सध्या निकालाचा अंदाज बांधण्यात व्यस्त झाले आहेत.
या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी राष्ट्रीय पक्षांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मात्र निवडणुकीत कोण विजयी ठरणार? आणि कोण पराभूत होणार? हे आता 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे. तोवर सध्या तरी निकालाबाबतची उत्सुकता ताणलेली आहे.
टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये शनिवारी 13 मे रोजी जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदार संघातील मतदानाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून 360 कर्मचारी असणार आहेत.
या पद्धतीने एकूण 1188 निवडणूक कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत राहणार आहेत. यासह मतमोजणी आणि निवडणूक निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतमोजणी केंद्र परिसरातील बंदोबस्तासाठी पोलिसांसह निमलष्करी दल तैनात असणार आहे.