विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातून तीन मराठा आमदारांनी कर्नाटक विधानसभेमध्ये प्रवेश केला आहे. विठ्ठल हलगेकर, श्रीनिवास माने व संतोष लाड हे ते तीन आमदार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी जाहीर झाला आणि कर्नाटकात काँग्रेसने सत्ता काबीज केली. मागील वेळी विधानसभेत निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये कांही मराठा आमदारही होते. यावेळीही मराठा आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खानापूरचे विठ्ठल हलगेकर, कलघटगीचे संतोष लाड आणि हनगलचे श्रीनिवास माने यांचा त्यामध्ये समावेश आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून जाण्याचा मान विठ्ठल हलगेकर यांना मिळाला आहे. संतोष लाड हे कलघटगी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे लाड हे यावेळी पाचव्यांदा आमदार झाले आहेत. श्रीनिवास माने हनगल विधानसभा मतदार संघात विजयी होऊन आमदार म्हणून विधानसभेत गेले आहेत.
मागील 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव उत्तरचे ॲड. अनिल बेनके, श्रीमंत पाटील व श्रीनिवास माने यांचा विजय झाला होता. त्यावेळी विधानसभेत हे तीन मराठा आमदार होते. यावेळी ॲड. बेनके यांना भाजपने उमेदवारी नाकारली, तसेच श्रीमंत पाटील यांचा पराभव झाला.
त्यामुळे कर्नाटक विधानसभेत आता विठ्ठल हलगेकर, संतोष लाड व श्रीनिवास माने हे तीन आमदार मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.