बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या राजकारणात नेहमीच जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखित होत आले आहे. २०२३च्या विधानसभा निवडणुकीत देखील तिन्ही भावंडांनी आपापले बालेकिल्ले अबाधित राखत लाखोंचे मताधिक्य मिळवत बाजी मारली आहे. यमकनमर्डी मतदार संघात सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधून तर अरभावी मतदार संघातून भालचंद्र जारकीहोळी आणि गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी यांनी भाजपमधून निवडणूक लढवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मागील निवडणुकीत फार कमी मतांच्या फरकाने विजयी ठरलेले सतीश जारकीहोळी या निवडणुकीत मात्र एकहाती सत्ता मिळवत १००२९० मते मिळवून बाजी मारली आहे. ६०.४२ टक्क्यांनी आघाडी घेत यमकनमर्डी मतदार संघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर त्यांनी ५७ हजार मतांच्या फरकानी विजय मिळवला आहे. मोठा विजय मिळवत त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसच्या विजयात देखील मोठी भूमिका निभावली आहे.
भालचंद्र जारकीहोळी हे अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमाप्पा गडाद यांचा पराभव केला असून ६०१६० मते घेऊन त्यांनी बाजी मारली आहे.त्यांनी ११४२४२ मते मिळवली आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सत्ता उलटून लावत किंगमेकर ठरलेले आणि राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावलेले रमेश जारकीहोळी यांनी देखील आपला बालेकिल्ला अढळ ठेवला असून गोकाक मतदार संघात १०५३१३ मते मिळवली असून प्रतिस्पर्धी उमेदवारावर २५ हजार इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.
कर्नाटकच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचा मोठा दबदबा आहे. जारकीहोळी हे पाच जण भाऊ असून यापैकी चार भाऊ राजकारणात सक्रीय आहेत. जारकीहोळी बंधूतील लखन जारकीहोळी हे विधान परिषद सदस्य आहेत. जारकीहोळी बंधूंची राहणी जरी साधी असली तरी राज्याच्या राजकारणात सर्व बंधूंची मोठी पकड आहे.
भाजपच्या कार्यकाळात रमेश जारकीहोळी मंत्री होते आता या नवीन सरकार मध्ये सतीश जारकिहोळी मंत्री असणार आहेत.