बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र लवाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र दोन्ही राज्यात आपसात असलेले अनेक मतभेद यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना दावणीला बांधले जाते. सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देऊ नये, अशा शब्दात आज शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कानपिचक्या देत नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज काँग्रेसच्या नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमास विरोधी पक्षांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला शुभेच्छाही दिल्या आणि येथील सीमाबांधवांच्या त्रासाकडे लक्ष देण्याची महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून रंगत आहे. त्यामुळे समविचारी असलेले बरेच नेते आज शपथविधीसाठी कर्नाटकात दाखल झाले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला उपस्थित राहून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये. या बांधवांकडे लक्ष द्या असं आम्ही नवीन सरकारला सांगत आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्याचा मार्ग एकदम मोकळा झाला. मुख्यमंत्री पदाचा पेचही संपुष्टात आला असून आज शपथविधी सोहळाही पार पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे.