बेळगाव लाईव्ह : शिक्षण खात्याने राज्यातील २४ शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षक भरतीसाठी तयारी करण्याची सूचना केली होती. १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षण खात्यातर्फे नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेली तत्कालिक यादी रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला होता.
त्यामुळे शिक्षण खात्यासमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र, शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या नव्या यादीप्रमाणे २४ जिल्ह्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या ६१५ जागा भरती केल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे अनेक शाळेतील रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची भरती होणार आहे.
शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी पुढील आठवड्यात केली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. भरती करण्यात येणाऱ्या ६१५ जागांमध्ये कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची संख्या अधिक असून, मराठी माध्यमाच्या शाळेत ८७ जागा भरती केल्या जाणार आहेत.
त्यापूर्वी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर विविध शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे.
राज्यात शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त असल्याने २०२२ पासून १५ हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तसेच, शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी घेतलेली परीक्षा पास झालेल्या परीक्षार्थीच्या गुणवत्तेनुसार तत्कालिक यादी जाहीर केली होती. तत्कालिक यादी जाहीर करण्यापूर्वी परीक्षा पास झालेल्या परीक्षार्थीची आवश्यक कागदपत्रे तपासली होती. मात्र, तत्कालिक यादी जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी यादीबाबत आक्षेप नोंदवीत न्यायालयात धाव घेतली होती.
त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. न्यायालयाने १:१ या अनुपाताप्रमाणे तयार केलेली यादी योग्य नसल्याचे सांगत तत्कालिक यादी रद्द करण्याची, सूचना शिक्षण खात्याला केली आहे.