बेळगाव लाईव्ह : तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवडयात बोलविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेउन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून लवकर बैठक बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच कार्यकर्ते सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागले आहेत.
कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेऊन पुढील काळात कोणत्या प्रकारे तालुक्यात संघटन वाढावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून विविध प्रकारच्या सूचना येत आहेत.
प्रत्येक गावागावात समितीचे संघटन बळकट करण्यासाठी येणाऱ्या काळात व्यापक पावले उचलावी लागणार आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव एम जी पाटील यांनी दिली आहे.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसह तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समितीला वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावे लागणार आहेत त्यामुळे निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांतील मरगळ दूर करण्यासाठी समितीला वेगवेगळे कार्यक्रम हाती घ्यावे लागणार आहेत. तसेच पराभव का झाला ? याबाबत विचार मंथन करावे लागणार आहे. त्यामुळे बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन आपली मते मांडणे गरजेचे आहे.
येणाऱ्या काळात समितीची ताकद ग्रामीण भागात पुन्हा एकदा वाढविण्यासाठी युवा वर्गाला सामावून घेणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीची तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती तालुका समितीतर्फे दिली आहे.