कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील विविध मतदार संघामध्ये किती जण आमदार म्हणून निवडून येणार याचा अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.
हे एक्झिट पोल सर्व्हे महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील बेळगावच्या मतदार संघांच्याबाबत काय अंदाज वर्तवतात? याकडे बेळगावच्या जनतेचे लक्ष लागून राहिले होते. एबीपी सी वोटर सह इतर जितके सर्व्हे झाले आहेत, त्या सर्व सर्व्हे -एक्झिट पोलमध्ये बेळगाव सीमाभागात अपक्ष आमदार निवडून येणार असे नमूद करण्यात आले आहे. सर्वच सर्व्हे मधून दोन ते सात अपक्ष आमदार निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खाते खुलणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव दक्षिण ,बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या तिन्ही मतदार संघात समितीसाठी अनुकूल वातावरण होते आणि प्रचारात समिती उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती त्यामुळे बेळगावात यंदा समितीचे आमदार निवडून येतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एकंदर विविध एक्झिट पोल मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन किंवा तीन आमदार निवडून येणार हे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून रमाकांत कोंडुसकर आणि बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले, हे दोघे विजय होतील तर खानापूर मधून चुरशीच्या लढतीत मुरलीधर पाटील बाजी मारतील असे सर्व्हेमधून प्रथमदर्शनी समोर आले आहे. राज्यभरातील एकूण एक्झिट पोल सर्व्हेचा अंदाज घेतला असता भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात खरी ‘कांटे की टक्कर’ आहे. तथापि निधर्मी जनता दल (जेडीएस) किंग मेकर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मतदानोत्तर चांचणीनुसार बहुतांश एक्झिट पोल सर्व्हेंनी कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या जवळ असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तारूढ होण्याचा अंदाज काही एक्झिट पोलद्वारे वर्तविण्यात आला असला तरी न्यूज नेशन -सीजीएसच्या आकडेवारीनुसार भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव शहराचा विचार केला असता बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीणमध्ये समितीचे उमेदवार वरचढ ठरणार आहेत. बेळगाव दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर सहज विजय होतील तर बेळगाव ग्रामीण मधून आर. एम चौगुले विरोधकांवर मात करतील असे एका संस्थेने आपल्या सर्व्हेत नमूद केले आहे. एकंदर एक्झिट पोलचे अंदाज पाहून सध्या सर्वांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.