बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुका जाहीर होताच एरव्ही महाराष्ट्रातील नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांसाठी पायघड्या घालण्यात येतात. सीमाभागात आपल्या भाषिक हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधार्थ प्रचार करण्यासाठी अलीकडे महाराष्ट्रातील सर्वपासखिया नेते दाखल होतात. मात्र या नेत्यांना सीमाप्रश्नाविषयी चाड नसल्याचे दिसून येत असून महाराष्ट्रातील नेत्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रचारदौऱ्यामुळे सीमावासीयातून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय पक्षांना दिल्लीवरून येणाऱ्या हायकमांडच्या निर्णयाला बांधील राहून तो निर्णय मान्य करावा लागतो. मात्र याआधीचे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये सीमाप्रश्नासंदर्भात कमालीची आपुलकी होती. हायकमांडचे निर्णय सुद्धा धुडकावून लावण्याची धमक होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या अनेक नेत्यांना सीमाप्रश्नासंदर्भात इत्यंभूत माहिती होती, जाणीव होती. मात्र अलीकडे सत्तेवर आलेल्या नेत्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमालढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे बलिदान याबद्दल यत्किंचितही माहिती नसल्याचे दिसून येत आहे.
अलीकडचे महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते हायकमांडच्या इशाऱ्यावर मान डूलवतात. धीरज देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनेक नेत्यांना सीमाप्रश्नाबद्दलची अधिक माहिती नाही. बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या भाजपच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांना काळे निशाण दाखवण्यात आले. सीमाभागातील मराठी माणसाच्या विरोधार्थ प्रचारासाठी आल्याचा एकमेव उद्देश आणि भूमिका मराठी भाषिकांची होती. पूर्वीचे नेते जरी निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात आले तरी सीमाभागात दौरा करणे टाळायचे. मात्र अलीकडच्या काळातील नेतेमंडळी महाराष्ट्र नंतर आणि राष्ट्र आधी अशी भूमिका घेत हायकमांडच्या इशाऱ्यावर मान डोलवत आहेत. सीमाभाग, सीमाप्रश्न आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी जी धमक या नेत्यांमध्ये असणे गरजेचे आहे, नेमका त्याचाच अभाव या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.
कर्नाटकातील मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होतात. दडपशाही केली जाते. यादरम्यान हेच महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रातून कर्नाटक सरकारला आव्हान देतात. आणि याच महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी केली जाते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांसाठी पायघड्या घातल्या जातात आणि पक्षाची जबाबदारी म्हणून महाराष्ट्रातील नेते सीमावासीयांकडे दुर्लक्ष करून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारही करतात, हे दुर्दैव आहे.
मराठी भाषिक मतदारांना गळ घालून राष्ट्रीय पक्षांना निवडून देण्याचे आवाहन भाजप आणि कांग्रेसकडून केले जाते. आणि यात भरीस भर म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात येते. मात्र सीमाभागातील मराठी भाषिक पद आणि सत्तेसाठी नव्हे तर मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढते हि बाब महाराष्ट्रातील नव्या नेत्यांच्या माहितीपटात नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्वप्रथम सीमालढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून सीमाभागात प्रचाराला येण्यापूर्वी सर्व बाबींकडे लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे, अशी भावना सीमाभागातील मराठी भाषिक व्यक्त करत आहेत.