शेतकऱ्यांचा आक्षेप, तक्रारी बाजूला सारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बहुचर्चित बेळगाव रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना कंत्राटदाराला केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येत्या कांही दिवसात सर्वेक्षणासह अन्य कामे सुरू होण्याची शक्यता आहे.
बेळगाव रिंगरोडच्या कामाला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना रिंग रोड विरोधातील लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेळगाव शहराचा रिंगरोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी रिंग रोडला विरोध दर्शविला आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले आहेत. याखेरीज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केल्यानंतर शेतकऱ्यांनी सुनावणी प्रसंगी मोठ्या संख्येने तक्रारी नोंदवल्या आहेत.
या पद्धतीने शेतकऱ्यांकडून आक्षेप आणि तक्रारी नोंदवून घेतल्यानंतरही प्राधिकरणाने त्याबाबत कोणताही निर्णय न घेता रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदाराला केली आहे.
परिणामी येणाऱ्या दिवसात विविध ठिकाणी जाऊन सर्वेक्षण आणि इतर प्रकारचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हलगा -मच्छे बायपास प्रमाणे हे काम पोलीस बंदोबस्तात हाती घेतले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई तीव्र करणे गरजेचे बनले आहे.