स्टार एअरलाइन्स या देशातील आघाडीच्या प्रादेशिक विमान कंपनीने नव्याने ताब्यात घेतलेल्या आपल्या एम्ब्राएर ई175 या विमानाची यशस्वी चांचणी घेतली असून गेल्या 9 मे 2023 रोजी या विमानाने बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यानचा प्रवास अवघ्या 1 तास 40 मिनिटात पूर्ण केला आहे.
या पद्धतीने स्टार एअरची बेंगलोर ते हैदराबाद दरम्यानची एम्ब्राएर ई175 व्यावसायिक विमान सेवा सुरू झाली आहे. आता विमानांची संख्या वाढल्यास बेळगाव येथून देखील ही विमान सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
एम्ब्राएर ई175 हे अत्याधुनिक तंत्रज्ञाने युक्त जेट विमान आहे. या विमानाची इंधन क्षमता देखील लक्षणीय असून विमानात जवळपास 76 पर्यंत प्रवासी सामावू शकतील इतके प्रशस्त केबिन आहे. एम्ब्राएर ई175 हे जेट विमान प्रगत विमान शास्त्राने सुसज्ज असून विमानाला फ्लाय -बाय -वायर कंट्रोल्स आणि काचेचे कॉकपिट आहे. ज्यामुळे उच्च दर्जाची सुरक्षा आणि कार्यक्षमता प्राप्त होते.
सदर विमानाची बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या उड्डानाची चांचणी अत्यंत तज्ञ वैमानिक आणि अभियंत्यांच्या समूहासह डीजीसीए अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली घेण्यात आली. या चांचणीप्रसंगी विमानाचे टेकऑफ अर्थात उड्डाण, अवकाशात झेपावणे, खाली येणे, धावपट्टीवर उतरणे वगैरे सर्व पैलू बारकाईने तपासण्यात आले. त्यानंतरच एम्ब्राएर ई175 च्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.