बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात चित्रदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर तर चिकोडी १२ व्या स्थानावर आहे. यंदाच्या निकालात बेळगाव जिल्ह्याचा टक्का घसरला असून बेळगाव २६ व्या क्रमांकावर आहे.
बेळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाला सुधारणार अशी अपेक्षा होती. मात्र बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावी निकाल घसरला असून, चिकोडीचा मात्र सुधारला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये सौंदतीची विद्यार्थिनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
यंदा ८३ टक्के निकाल लागला असून एकूण ७ लाख ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ४ विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी ६२५ गुण मिळविले असून ३,४१,१०८ विद्यार्थी व ३,५९,५११ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात २३ जिल्ह्यांना ‘ए’ ग्रेड, १२ जिल्ह्यांना ‘बी’ ग्रेड देण्यात आले आहेत. १५ मे ते २१ मे या दरम्यान पुनर्मूल्यमापन करण्यासाठी संधी आहे. तसेच आजपासून १५ मे पर्यंत अनुत्तीर्ण विद्यार्थी पुनःपरीक्षेसाठी नाव नोंदवू शकतात.
बेळगाव शैक्षणिक जिल्हा गतवर्षी दहावी निकालात ८७.८० टक्के गुण घेत १८ व्या स्थानी होता. यंदा ८५.८५ टक्के गुण घेत २६ व्या स्थानी आला आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्हा ८७.९५ टक्के गुण घेत १७ व्या स्थानी आला होता. तो ९७.०७ टक्के गुण घेत १२ व्या स्थानी आला आहे. चित्रदुर्ग जिल्हा ९६.०८ टक्के गुण घेत राज्यात प्रथम आला आहे. गतवर्षी हसन जिल्हा प्रथम स्थानावर होता.