बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २० जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य असून आमदारांनी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या आमदारांना जनतेसाठी मेहनत घेऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या बैठकीत सत्तावाटप, मंत्रिपदासह पक्षातील अंतर्गत प्रश्नांवर देखील गंभीर चर्चा झाली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे वक्तव्य न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. याचप्रमाणे आपापल्या मतदार संघातील जनतेच्या समस्यांकडे आमदारांनी लक्षपूर्वक पाहावे, समस्या ऐकून घ्याव्यात, जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत, बदल हवा आहे यासाठीच त्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी आमदारांना देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी, पूर याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, त्यांना पुरवले जाणारे बी-बियाणे, खतांचा साठा यासंदर्भात योग्य खबरदारी आणि उपाययोजना करण्यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांमध्ये मुबलक निधी उपलब्ध आहे. गरज भासल्यास वाढीव अनुदान देखील दिले जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आमदारांना सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीत आपल्याला २० जागा जिंकायच्या असून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर स्वस्थ न राहता घोडदौड कायम ठेवायची आहे, याचप्रमाणे बेंगळुरू महानगरपालिका निवडणूक देखील आपल्याला जिंकायची असल्याचे डीकेशी म्हणाले.
जिल्हा पालक मंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदारांनी पक्ष कार्यालय स्थापन करावे, पक्ष कार्यालय आमच्यासाठी मंदिरासमान असून पक्षाचे कार्य हेच देवाचे कार्य म्हणून करावे, निवडणुकीतील विजयासाठी कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांची जाणीव ठेवावी, राज्यातील जनतेला स्वच्छ प्रशासन देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा सल्लाही आमदारांना देण्यात आला.