कणबर्गी येथील खाजगी मालकीच्या चार गुंठे जागेतून रस्ता तयार केल्याच्या वादाची निर्धारित वेळेत माहिती न दिल्याप्रकरणी कर्नाटक लोकायुक्तांनी बेळगाव महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी व महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीला 23 मे पर्यंत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस शासनाकडे केली जाईल असा इशाराही दिला आहे.
सध्या मनपा आयुक्त डॉ. घाळी हे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे निवडणूक अधिकारी आहेत. मात्र नोटीस आल्यामुळे कणबर्गी रस्ता प्रकरणाची फाईल शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान लोकायुक्तांची नोटीस येण्याआधीच आयुक्तांनी महसूल विभागातील संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कणबर्गी गाव महापालिका हद्दीत येते येथील चार गुंठे जागेतून रस्ता तयार करण्यात आला आहे. संबंधित जमीन मालकाने त्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
लोकायुक्तांनी या प्रकरणी वेळोवेळी नोटीस धाडून देखील महापालिकेकडून त्याला प्रत्युत्तर मिळालेले नाही. आता त्याची गंभीर दखल लोकायुक्तांनी घेतली आहे. सरकारी कर्मचारी असूनही लोकायुक्तांच्या नोटीसला उत्तर न देणे हा बेजबाबदारपणा असल्याचा गंभीर अभिप्राय कारणे दाखवा नोटीसित नोंदविला आहे.
शिवाय महापालिका आयुक्त व महसूल उपायुक्त अकार्यक्षम असल्याचा ठपकाही ठेवला आहे. त्यामुळे आता या नोटिसीची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.
याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई होण्याच्या शक्यतेने आयुक्त व महसूल उपायुक्त सजग झाले आहेत. त्यांना आता येत्या 23 मे पूर्वी लोकायुक्तांना उत्तर द्यावे लागणार आहे.