Friday, January 3, 2025

/

अल्पावधीत सुरू होणार श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

 belgaum

बेळगावच्या पारंपारिक आणि ऐतिहासिक श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला अल्पावधीत प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीच्या शुभारंभाची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी नरगुंदकर भावे चौक साफसूफ करून सज्ज ठेवण्यात आला आहे. याखेरीज शुभारंभाच्या ठिकाणी बरेच चित्ररथ देखील दाखल झाले आहेत.

सालाबाद प्रमाणे शहरातील नरगुंदकर भावे चौक येथून आज सायंकाळी 6 वाजता विधिवत पालखी पूजन होऊन श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली महादेव पाटील, सागर पाटील आदी इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी नरगुंदकर भावे चौकातील पालखी पूजन ठिकाणाची साफसफाई स्वच्छता केली. या कामी त्यांना भावे चौकातील रस्त्यावर भाजी विक्री करणारे भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि ऑटो रिक्षा चालक यांचे सहकार्य लाभले. याखेरीज परवा शहर पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या श्री शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीतील सूचनेनुसार मिरवणूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने भावे चौकात लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सध्याच्या घडीला मारुती गल्लीतील सत्कार हॉटेलपासून श्री मारुती मंदिरापर्यंत जवळपास 15 ते 20 चित्ररथ येऊन उभे राहिले असून ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी नरगुंदकर भावे चौकात मंडप घालण्यात आलेला नाही. त्यामुळे आता जे चित्ररथ येणार आहेत ते कलमठ रोड मार्गे तर कांही चित्ररथ गणपत गल्ली आणि देशपांडे गल्ली मार्गे येणार आहेत. या सर्व चित्ररथाना मार्गदर्शन करून त्यांना क्रमवार मिरवणुकीत सहभागी होण्याची सूचना देण्यासाठी भावे चौकात मिरवणुकीच्या शुभारंभाच्या ठिकाणी बसविलेल्या लाऊड स्पीकरचा वापर केला जाणार आहे.Shiv jayanti

श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते आता सायंकाळी 6 वाजता पालखी पूजन करून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी श्री शिवजयंती उत्सव महामंडळ आणि शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य त्याचप्रमाणे खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधीसह जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. पालखी समोर अग्रभागी तब्बल 80 सदस्यांचे मोरया झांज पथक असणारा असून त्या मागोमाग 40 लहान मुला -मुलींचा मंथन लाठीमेळा असणार आहे. त्याचप्रमाणे पालखी समोर सनई चौघड्यासह 35 जणांचा वडगावचा वारकरी भजनी मेळा असेल.

एकंदर अल्पावधीत बेळगावच्या ऐतिहासिक श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला जल्लोषी प्रारंभ होणारा असून साऱ्यांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. नागरिक आणि शिवप्रेमींनी चित्ररथांचा आनंद लुटण्यासाठी आतापासूनच मिरवणूक मार्गावरील मोक्याच्या जागांवर आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.