Wednesday, December 25, 2024

/

डीजे मुक्त चित्ररथ मिरवणूक साजरी होणार : पोलीस विभाग – ‘मध्यवर्ती’ च्या बैठकीत निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात आज कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक तयारी संदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, उपाध्यक्ष मालोजीराव अष्टेकर, कार्यवाह रणजित चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत २७ मे रोजी होणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत प्रामुख्याने चित्ररथ मिरवणूक मार्ग, देखावे सादरीकरणासाठी ठिकाण, पार्किंग व्यवस्था, वेळेचे नियोजन आणि चित्ररथ मिरवणूक सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आतापर्यंत उत्तर विभागातील ४३ आणि दक्षिण विभागातील १५ सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी नावे नोंदविली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २७ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता नरगुंदकर भावे चौक येथून मान्यवरांच्या उपस्थितीत परंपरेनुसार चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होईल.

नरगुंदकर भावे चौकापासून पुढे मारुती गल्ली,हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलजेरोड़, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ देवस्थान सर्कल मार्गे रामलिंग खिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक, शेरी गल्ली कॉर्नर, हेमू कलानी चौक, पाटील गल्ली, शनी मंदिर सर्कल, कपिलेश्वर उड्डाणपूल, हॉटेल रेणुका सर्कल मार्गे उड्डाणपुलाच्या खालून कपिलेश्वर देवस्थानासमोर मिरवणुकीची सांगता होईल. या मार्गावरील प्रमुख चौकात देखावे सादरीकरण करण्यासाठीही सूचित करण्यात आले आहे.

मागील वेळी मिरवणुकीत एक दिवस आधीच सार्वजनिक उत्सव मंडळांनी चित्ररथ मिरवणूक मार्गावर उभारले होते. यामुळे ऐन मिरवणुकीच्या प्रारंभी वाढलेल्या गर्दीमुळे कोंडी निर्माण झाली. यंदा हि गर्दी टाळण्यासाठी आणि मिरवणुकीत सुसूत्रता आणण्यासाठी पालखीच्या मागच्या बाजूने चित्ररथ सहभागी करावयाचे आहेत. यासाठी कलमठ रोड आणि रविवार पेठ हे मार्ग सुचविण्यात आले आहेत. गणपत गल्ली, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली या मार्गावरून येणाऱ्या चित्ररथांसाठी क्रमांक देण्यात येणार असून राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून येणाऱ्या चित्ररथांनी रात्री ८ पूर्वी मुख्य मिरवणूक मार्गात सहभागी होण्याची सूचनाही करण्यात आली आहे. अन्यथा ८ नंतर येणाऱ्या चित्ररथांना कॉलेज रोड मार्गे मिरवणूक सहभागी करून घेतले जाईल. मुख्य मिरवणूक मार्गावरील नरगुंदकर भावे चौक येथे स्थानिक पोलीस अधिकारी तैनात करण्यात यावेत, पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करून द्यावी, पार्किंगच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्तीने पोलीस विभागाकडे केली आहे.Cop

मध्यवर्तीच्या या मागणीला पोलीस विभागानेही होकार दर्शविला आहे. प्रत्येक चित्ररथासाठी मिरवणुकीसंदर्भातील प्रत्येक नियम सक्तीने पाळणे गरजेचे असून यंदाची चित्ररथ मिरवणूक डीजे मुक्त साजरी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. प्रशासनाने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक डीजेमुक्त करण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या केला असून शिवजयंती चित्ररथ मिरवणूक देखील याच धर्तीवर यशस्वी आणि जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगावची चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव आणि परिसरातील, ग्रामीण भागातील आणि उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो रुपये खर्चून बहुसंख्य नागरिक आवर्जून उपस्थित राहतात. चित्ररथ मिरवणुकीतील देखावे, झांझ पथक, ढोल ताशा, ध्वजपथक या सर्व गोष्टींचे सादरीकरण प्रत्येकाला पाहता यावे, ऐकता यावे, इतिहास पुन्हा जवळून अनुभवता यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र डीजेमुळे सर्वांचा हिरमोड होतो. मागील वेळी अनेक चित्ररथावर उत्कृष्ट देखावे सादर करण्यात आले. मात्र डीजेच्या कर्कश्श आवाजामुळे नागरिकांना देखावे पाहता आले नाहीत. यामुळे यंदाची चित्ररथ मिरवणूक सक्तीने डीजेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्ररथ मिरवणुकीत सामाजिक सलोखा बिघडेल, धार्मिक तेढ निर्माण होईल असे देखावे सादर करू नयेत असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. चित्ररथ मिरवणुकीसाठी आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करण्याचे आश्वासन पोलीस विभागाने दिले असून चित्ररथ मिरवणूक जल्लोषात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात तसेच शांततेत आणि सुरळीत पार पाडावी यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.