बेळगाव लाईव्ह : २९ मेपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून शिक्षण विभागाने जय्यत तयारी सुरु केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासह विविध सूचना शिक्षण विभागाने शाळा आणि पालकांना केल्या आहेत.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास अवघा ११ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षण खात्यासह विद्यार्थ्यांची लगबग वाढली आहे. शिक्षण खात्याने शैक्षणिक वेळापत्रकही जाहीर केले आहे.
त्यानुसार शाळांना अभ्यासक्रम, परीक्षा, पालक बैठका आदींचे नियोजन करावे लागणार आहे. २९ मे पासून शाळेला सुरुवात होणार असून त्यापूर्वी दोन दिवस शाळांमध्ये स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना शाळेत हजर होऊन सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी पालकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात, असेही कळविण्यात आले आहे.
शिक्षण खात्याने पत्रकाद्वारे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार शिक्षकांना नियोजन करावे लागणार आहे.शिक्षण खात्याने पाठ्यपुस्तके देखील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची तयारी केली असून पुस्तकांचा पुरवठा सुरु झाला आहे. ती पुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिवाय यापूर्वीच गणवेश देखील वितरीत करण्यात आले आहेत.
शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांची आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहेत. वह्या, दप्तर आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पुढील काही दिवस बाजारात गर्दी होणार आहे. दरवर्षी मे अखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. मात्र, गेल्यावर्षी १५ दिवस अगोदरच शाळा सुरु झाल्या होत्या. यावेळी पुन्हा मे अखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.