राजकारणामध्ये माणसाची दूरदृष्टी आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी निराश झालेलो नसून माझे देखील अच्छे दिन येणार आहेत, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्रीपद गमावल्यानंतर प्रथमच ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजकारणात माणसाची दूरदृष्टी आणि संयम फार महत्त्वाचा असतो.
राजकारणात कोणीही साधू, भोळा भाबडा नसतो प्रत्येकाला मंत्री व्हायचे असते. मंत्री झाले की त्याला उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री होण्याचे वेध लागतात. प्रत्येकाची मोठी अपेक्षा असते आणि आकांक्षा असतात. या आकांक्षांना अंत नसतो ती माणसाची नैसर्गिक मानसिकता आहे, असे आमदार सवदी म्हणाले.
सिद्धरामय्या केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याच्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही याबाबत सिद्धरामय्या यांनाच विचारा असे ते म्हणाले. सिद्धरामय्या आणि हाय कमांड यांच्यात चार भिंतींमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. सिद्धरामय्या आणि पक्ष नेत्यांमधील चर्चा उघड झालेली नाही. तथापि बाहेर फक्त अटकळी बांधल्या जात आहेत असे सांगून काँग्रेसच्या गॅरंटी योजनांबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप याबाबतीत संभ्रम निर्माण करत आहे.
गॅरंटी योजनांच्या अनुषंगाने आधी सर्वेक्षण होऊ द्या, त्यानंतर मार्गदर्शक सूची येईल. थोडक्यात काँग्रेस सरकार आपल्या हमी योजना राबविलेल्या शंका नाही, असे आमदार लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी निराश झालेलो नाही. माझे देखील अच्छे दिन येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.