राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळविणारे सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर या उभयतांचे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या रविवारी बेळगावमध्ये आगमन होणार आहे.
बेळगाव शहरात उद्या रविवारी सकाळी 10:30 वाजता दाखल होणारे मंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सर्वप्रथम कित्तूर राणी चन्नम्मा, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, वीर संगोळी रायण्णा आदी महान व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.
या मंत्री व्दयींचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून बेळगाव विमानतळापासून या दोन्ही नेत्यांची भव्य मिरवणूक काढण्यासाठी कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतक सज्ज झाले आहेत.
यमकनमर्डीचे आमदार असलेले सतीश जारकीहोळी यांनी गेल्या 20 मे पासून तर बेळगाव ग्रामीणच्या आमदार असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 27 मे पासून कॅबिनेट मंत्री म्हणून अधिकार पदाची शपथ घेतली आहे.
सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण हे खाते मिळाले आहे.