बेळगाव लाईव्ह : यमकनमर्डी मतदार संघात २००८ पासून २०२३ पर्यंत आमूलाग्र बदल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा पाठिंबा दिल्यास यमकनमर्डी मतदार संघ राज्यातील टॉप टेन मतदार संघापैकी एक बनवू, आपण केलेली प्रगती आणि जनतेचा विश्वास यामुळे इतक्या प्रचंड मताधिक्याने काँग्रेसचा विजय होईल, ज्यामुळे पुढील २० वर्षे विरोधक जवळही फिरकणार नाहीत असा ठाम विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
यमकनमर्डी मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आज भूतरामनहट्टी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेत ते बोलत होते. प्रचंड जनसमुदायासमोर आज जोरदार शक्तिप्रदर्शनात काँग्रेसची सभा पार पडली.
२००८ पासून आतापर्यंत सुमारे १५ वर्षे यमकनमर्डी मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला आहे. आजपर्यंत यमकनमर्डी मतदार संघात झालेला आमूलाग्र बदल याला जनता साक्षी आहे. मूलभूत आणि पायाभूत सुविधांसह प्रत्येक क्षेत्रातील समस्या दूर करून या भागात प्रगती करण्यात आली आहे.
यापुढील काळातही जनतेच्या पाठिंब्याने अधिकाधिक प्रगती करून यमकनमर्डी मतदार संघ राज्यात पहिल्या १० उत्तम मतदार संघांच्या यादीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, यमकनमर्डी मतदार संघाच्या मतमोजणीला १८ फेऱ्या व्हाव्या लागतात. मात्र पहिल्याच फेरीत मताधिक्य आपल्याबाजूने येईल तसेच आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता प्रचंड मताधिक्याने येईल आणि इतिहास बनवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सभेला केपीसीसी कार्याध्यक्ष सलीम अहमद, लक्ष्मण राव, वीरकुमार पाटील, असिफ सेठ आदींसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विविध पदाधिकारी आणि काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.