Thursday, January 9, 2025

/

27 रोजी श्री शिवजयंती मिरवणूक; बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 belgaum

विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली बेळगावची पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्तीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा येत्या शनिवारी म्हणजे दि. 27 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली असून त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने या ऐतिहासिक मिरवणुकीला प्रारंभ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचे दर्शन घडविणारे बेळगावच्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील देखावे शिवकालीन घटनांचा साक्षात्कार घडवून समाजाला प्रेरणा देतात. शिवचरित्रासह शिवरायांच्या सामर्थ्यांचे प्रलयकारी दर्शन जसे बेळगावच्या श्री शिवजयंती मिरवणुकीत घडते तसे अन्यत्र कोठेही घडत नाही. त्यामुळे येथील शिवजयंती उत्सवाची ख्याती दूरवर पसरली आहे.

बेळगावमध्ये या दिवशी जणू शिवसृष्टीच अवतरते. ज्याची अनुभूती प्रत्येकाला येते. ही शिवसृष्टी पाहण्यासाठी बेळगावच नाही तर चंदगड, निपाणी, कोल्हापूर, गोवा आदी भागातील शिवप्रेमी बेळगाव शहरात डेरे दाखल होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजोमय जीवनाची कथा बेळगावच्या शिवजयंती उत्सवामधून युवा पिढीला समजते. त्याचप्रमाणे आपले जीवन सामर्थशाली बनवण्याची प्रेरणाही मिळते. शिवजयंती मिरवणुकीतील चित्ररथ देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश दिले जातात. अन्याय -अत्याचार, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार वगैरे विषयांवरील चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरत असतात.

मिरवणुकीत शिवकालीन घटनांवर आधारित प्रसंग सादर केले जातात. चित्ररथांसमोर लाठीमेळा, लेझीम, ढाल -तलवार, दांडपट्टा, झांजपथक अशी विविध रूपं सादर करणारे मर्दानी खेळ व दृश्य शिवप्रेमींच्या डोळ्यांची पारणे फेडणारी असतात. मिरवणुकीमध्ये आबाल वृद्धांसह महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती असते.

यासाठीच चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभाग घेणाऱ्या शिवजयंती मंडळांनी संयम, समन्वय, शिस्तबद्धता आणि शांततेने अपूर्व उत्साहात आपापल्या ठरविलेल्या विभागातून जल्लोषात चित्ररथ फिरवून होईल तितक्या लवकर मुख्य चित्र देखावा मिरवणुकीत सहभागी व्हावे. जेणेकरून आपण अथक परिश्रम घेऊन केलेला सराव, त्यातून साकार केलेल्या शिवकालीन भूमिका पाहून शिवप्रेमी नागरिकांना तुमचे कौतुक करण्याची संधी मिळेल असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने केले आहे.

यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे. नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ, त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खुट (राजेंद्र प्रसाद चौक), कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल (कपिलेश्वर ब्रिज) मार्गे कपिलेश्वर मंदिरानजीक सांगता.

दरम्यान, यंदाची शिवजयंती मिरवणूक दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसादात शांततेत यशस्वी करण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह सर्व शिव जयंती मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने श्री शिवजयंती मिरवणुकी प्रसंगी हजेरी लावावी, असे आवाहन मध्यवर्तीय शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.