छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानून हिंदुत्वाचे रक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवानेते आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर हे कशा पद्धतीने हिंदुत्वाचे संवर्धन करत आहेत याचा एक पैलू नुकताच समोर आला जेंव्हा विशाल खर्गेकर या बालकाचा त्यांनी सत्कार केला.
हा सत्कार यासाठी होता की विशालने वादळी पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर कोसळून पडलेला पवित्र भगवा ध्वजाची शान राखताना त्याला पुन्हा उंचावून सन्मानाने निवार्याला नेले.
याबाबतची माहिती अशी की, काल रविवारी पाऊस -वाऱ्यामुळे गोवावेस येथील कोरे गल्ली कॉर्नर येथील श्री शिवजयंती स्वागत कमानीवरील भगवा ध्वज कोसळून खाली रस्त्यावर पडला होता. सदर बाब कांही अंतरावर निवार्याला थांबलेल्या विशाल खर्गेकर या बालकाच्या निदर्शनास येताच त्याने मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची पर्वा न करता पुढे धाव घेतली आणि रस्त्यावर पडलेला पवित्र भगवा ध्वज सन्मानाने उचलून निवार्याच्या ठिकाणी नेला. वादळी पावसाची पर्वा न करता विशालने क्षणात केलेली ही कृती आसपास निवार्याला थांबलेल्या नागरिकांना एक नवी प्रेरणा देऊन गेली. सदर बालकाने केलेल्या या अभिमानास्पद कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या विशालचे सोशल मीडियावरही प्रचंड कौतुक झाले. समाज माध्यमाने उचलून धरण्याबरोबरच त्याच्यावर व्हिडिओ पाहून देश विदेशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
शहरातील आपल्या एका बाल मावळ्याचे भगव्या ध्वजावरील निस्सिम प्रेम महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांना इतके भावले की त्यांनी विशाल खर्गेकर या बालकाची प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक करण्याबरोबरच त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांसमोर विशालने केलेल्या अभिमानास्पद कृतीची माहिती देऊन या छोट्या मुलाचा आदर्श सर्वांनी घेणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी माजी महापौर महेश नाईक समितीचे कार्यकर्ते सुनील बोकडे रवी धनुचे, ज्योतिबा काळशेकर, अशोक नेसरीकर, यश नेसरीकर, प्रवीण शहापूरकर आदिसह विशालचे मित्र आणि अन्य बालचमू उपस्थित होता.