Sunday, January 19, 2025

/

अपघाताला निमंत्रण देतेय काँक्रीट रस्त्यावरील ‘ही’ दलदल

 belgaum

नव्याने कॉंक्रिटीकरण करण्यात आलेला आरपीडी क्रॉस येथील खानापूर रोड या रस्त्यावर सध्या अपघाताला निमंत्रण देणारी चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून धोकादायक निसरडा झालेल्या या रस्त्यावरील दलदल तात्काळ साफसफाई करून हटवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून विशेषत: दुचाकी वाहन चालकांकडून केली जात आहे.

नव्याने कॉंक्रिटीकरण करण्यात आलेला आरपीडी क्रॉस येथील खानापूर रोड हा रस्ता सध्या चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेला रस्ता वाहन चालक आणि जनतेसाठी सोयीचा ठरण्याऐवजी मनस्ताप देणारा धोकादायक ठरत आहे. गोवावेस येथून तिसऱ्या रेल्वे गेटकडे जाणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी मार्गाचे अर्थात खानापूर रोडचे गत भाजप सरकारच्या कालावधीत काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे कॉंक्रिटीकरण अवैज्ञानिक आणि विनाकारण जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारे असल्याचा आरोप केला जात असताना आता आरपीडी क्रॉस नजीक या रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागात चिखल सदृश्य दलदल निर्माण झाली आहे.

कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर त्यावर पाण्याचा ओलावा राहावा यासाठी टाकण्यात आलेली गोणपाटे अर्थात पोती वेळीच हटवण्यात ऐवजी ती रस्त्यावर तशीच सोडून देण्यात आली होती. वळीवाची हजेरी आणि गोणपाटांवरून वाहनांची सततची रहदारी झाल्यामुळे आता त्या गोणपाटांचे चिखल सदृश्य दलदलीत रूपांतर झाले आहे. ज्यामुळे या दलदलीतून वाहने हाकताना वाहन चालकांना विशेषत: दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. Rpd

दलदलीमुळे सध्या हा रस्ता निसरडा झाला असून दररोज एखाद दुसरा दुचाकी वाहन चालक घसरून पडल्यामुळे किरकोळ जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. नव्याने काँक्रिटीकरण करून देखील सदर रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्याबरोबरच सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकऱ्याने बेळगाव दक्षिणच्या आमदारांना एकदा या रस्त्यावर दुचाकी चालवा, असे निमंत्रण दिले आहे.

अन्य एकाने मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कानावर ही बाब घालण्याचा सल्ला दिला आहे. तर आणखी एकाने सदर रस्ता स्वच्छ होण्यासाठी राजकीय नेत्यांना या रस्त्यावर रॅली काढण्याचे निमंत्रण द्यावे असे सुचवण्याबरोबरच आता जनतेने जागे होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.