राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे बेळगाव शहराचा पाणीपुरवठा कमी झाला आहे. हिडकल आणि राकसकोप या दोन्ही जलाशयातील पाणी साठ्याची पातळी गतवर्षीपेक्षा अधिक खालावली आहे.
सध्या शहराला 10-15 दिवस पुरेल इतके पाणी राकराकसकोप जलाशयात असले तरी त्यानंतर मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. त्यामुळे बेळगाव शहरवासियांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
जलाशयातील पाणीसाठा खालावल्यामुळे ज्या भागात 3-4 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत होता, त्या ठिकाणी आता 6 ते 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. जर पाण्याची समस्या आणखी गंभीर झाली तर पाणीपुरवठा अधीक कपात केली जाऊ शकते.
राकसकोप जलाशयामध्ये काल रविवारी 6.5 फूट इतका पाणीसाठा होता. सुदैवाने हिडकल जलाशयामध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे अजून तरी बेळगाव उत्तर विभागामध्ये पाणी टंचाईची समस्या तितकीशी गंभीर झालेली नाही.
या उलट बेळगाव दक्षिण विभागाला मात्र पाणी तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. तसे पाहता हिडकल जलाशयातील पाणीसाठा देखील मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या महिन्यात कमीच आहे.