बेळगाव लाईव्ह : सोमवारी सायंकाळी संपूर्ण बेळगावमध्ये अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने बेळगावकरांची त्रेधातिरपीट उडवली. सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक सुरु झालेल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर जोरदार वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे कोसळली आहेत तर कित्येक ठिकाणी घरांची पडझड, घरांवरील पत्र उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत. विशेषतः ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आहेत त्या ठिकाणचे रस्ते मंगळवारी दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद असलेले पहायला मिळाले. ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून दुसऱ्या ठिकाणी उडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनात आले आहे.
सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने हवेत कमालीचा उष्मांक जाणवत होता. ढगाळ वातावरणातही उन्हाच्या झळा तीव्र असल्याने उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाचा शिडकावा सुरु झाला. काही वेळातच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. चारीबाजूनी धूळ आणि कचरा उडण्यास सुरुवात झाली यामुळे गजबजलेले रस्ते अचानक स्तब्ध झाले .
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून घरात घुसले होते. तसेच ठिकठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधीतून नागरिकांना जाण्याची वेळ आली होती. वादळी वाऱ्यासह झोडपून काढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून विजेच्या खांबावर पडले होते.
सोमवारी झालेल्या पावसानंतर पडलेली झाडे बाजूला काढण्यात आणि विजेचे खांब दुरुस्त करण्यात मंगळवारची दुपार झाली. सोमवारी सायंकाळीच बेळगाव शहरातील बहुतांशी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
दुरुस्ती आणि वृक्ष बाजूला काढून पूर्ण होईपर्यंत नागरिकांना मंगळवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट पहावी लागली.
सोमवारच्या अवकाळीमुळे महाद्वार रोड परिसरात दुर्घटना
बेळगाव लाईव्ह : सोमवारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून महाद्वार रोड येथील संभाजी गल्ली च्या मागील बाजूस देखील विजेचा खांब उन्मळला आहे. विजेचा खांब उन्मळून झाडावर पडल्यामुळे झाड देखील तुटले आहे. सुदैवाने यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.