Thursday, January 2, 2025

/

चोरीचे सरकार चोरीच होणार : राहुल गांधी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. आज काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ यमकनमर्डी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कर्नाटकात २०१८ साली झालेल्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला निवडून दिले. मात्र भारतीय जनता पक्षाने येथील आमदारांना विकत घेऊन सरकार चोरले. चोरीचे सरकार हे चोरीच होणार असून गेल्या तीन वर्षात भाजपने कर्नाटकात चोरीचे रेकॉर्ड तोडले असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.

कर्नाटकात भाजप सरकारच्या काळात अनेक प्रकारचे घोटाळे उघडकीस आले. पंतप्रधानांपर्यंत या घोटाळ्याबाबत पत्र जाऊन देखील पंतप्रधानांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. ४० टक्के कमिशन घेणाऱ्या या पक्षाच्याच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची २५०० कोटींमध्ये खरेदी केली जाऊ शकते असा धक्कादायक खुलासा केला. पोलीस भरती, अभियांत्रिकी, प्राध्यापक, सहकारी बँक अशा अनेक ठिकाणी भरतीमध्ये घोटाळा झाला, प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कर्नाटकातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचे तांडव घातले असून याठिकाणी पंतप्रधान येऊनदेखील भ्रष्टाचाराबाबत कधीच काहीच बोलत नाहीत. गेल्या तीन वर्षात उघडकीस आलेल्या घोटाळ्यांमधील दोषींना आजवर शिक्षा झाली नाही. पंतप्रधान केवळ कारणे देतात मात्र भ्रष्टाचाराविरोधात काहीच बोलत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

देशात गॅस, पेट्रोल दरवाढ, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटकात २ कोटी युवकांना बेरोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. कर्नाटकातील पूरपरिस्थिती हाताळण्यात, परराज्यासोबतचे पाणीप्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. विरोधकांची टीका मोजण्याचा वेळ भाजप सरकारला आहे मात्र जनतेच्या समस्यांविषयी, शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भाजप सरकारला आस्था नाही. काँग्रेसने आजवर जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करून दाखविली आहेत. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासह सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे क्रांतिकारी काम करण्यात आले. भाजपाप्रमाणे नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय काँग्रेसने घेतले नाहीत आणि भविष्यातही घेणार नाही.Rahul gandhi

भाजपाप्रमाणे काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली तर पहिल्याच दिवशी पाच क्रांतिकारी निर्णय पूर्ण करण्यात येतील. यामध्ये गृहलक्ष्मी, सखी, अन्नभाग्य, गृहज्योती आणि युवानिधी या पाच गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. गेल्या ३ वर्षात भाजपने गोरगरीब जनतेकडून लुटलेला पैसा गरिबांनाच परत करण्यासाठी या योजना असून प्रत्येक महिन्याला महिलांना बँक खात्यात २००० रुपये, कर्नाटकात मोफत बससेवा, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी १० किलो मोफत तांदूळ, २०० युनिट मोफत वीज, ५ वर्षांच्या कार्यकाळात १० लाख युवकांना रोजगार, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, पदवीधर युवकांना २ वर्षांसाठी ३००० रुपये प्रतिमहिना, डिप्लोमाधारकांसाठी २ वर्षे प्रतिमहिना १५०० रुपयांचा निधी, १.५ लाख कोटी शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध सब्सिडीमध्ये वाढ अशा अनेक गोष्टी करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

गेल्या ४० वर्षातील बेरोजगारीचा उच्चांक भाजप सरकारच्या कालावधीत गाठला आहे. ३ वर्षात कर्नाटकात कोणते बदल झाले हे सांगण्याऐवजी पंतप्रधान आतंकवादाविषयी बोलतात. आतंकवाद त्यांच्यापेक्षा मला जास्त माहीत असून माझ्या आजी आणि वडिलांबाबत झालेल्या घटनेमुळे आतंकवादाची माहिती मला अधिक माहिती असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. जे सरकार ४० टक्के कमिशनवर चालते त्या सरकारला या निवडणुकीत ४० वरच समाधान मानावे लागेल, आणि संपूर्ण राज्यात १५० हुन अधिक जागांवर काँग्रेस बहुमताने येईल, अशा पद्धतीने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.