बेळगाव लाईव्ह : येत्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषा, मराठी भाषिक आणि मराठी संस्कृतीचे मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करणाऱ्या, मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा, असे आव्हान म. ए. समितीचे ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले.
आज सांबरा येथे आयोजिलेल्या प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते. ग्रामीण मतदार संघातील जनतेचा आर. एम. चौगुले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला असून आज सांबरा येथे झालेल्या प्रचार फेरीदरम्यान उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येवरून याचा प्रत्यय आला. ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आर. एम. चौगुले यांच्यावर टीका केली होती.
या टीकेला प्रत्त्युत्तर देताना आर. एम. चौगुले म्हणाले, आपण समितीमध्ये गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहोत. समितीमध्ये एकनिष्ठपणाने सक्रिय आहोत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषिकांना अमिश दाखवून मराठीविरोधी आमदार प्रेमाचे ढोंग करत आहेत. ५० हजार रुपयांचे कर्ज फेडण्याची ताकद नसलेल्या आमदारांकडे अचानक इतकी मालमत्ता कुठून येते? याचा विचार करा, असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी केले. रोजगार हमी योजनेबद्दल जनतेला चुकीची माहिती देण्यात येत असून हि योजना आमदारांच्या खिशातून नव्हे तर केंद्र सरकारच्या निधीतून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालणारी योजना आहे. ज्यांच्याकडे स्वतःचीच गॅरंटी नाही ते २००० रुपयांचे गॅरंटी कार्ड वाटप करत आहेत, अशा शब्दात आर. एम. चौगुले यांनी खिल्ली उडविली.
आर. एम. चौगुले पुढे म्हणाले, मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या आमदारांना हद्दपार केलं पाहिजे. संस्कार नसलेल्यांनी संस्कृतीची भाषा करु नये. कर्नाटकात राहणारा प्रत्येक नागरिक कन्नडच आहे असे सांगणाऱ्या आमदार मराठी भाषिकांकडे आल्या कि मराठीत बोलतात. महाराष्ट्राच्या नेत्यांना प्रचाराला बोलावतात. मराठी भाषिकांच्या जमिनी हडप करून रिंग रोड सारखे प्रस्ताव आखण्यात येतात अशावेळी आमदार कधीच तोंड उघडत नाहीत. खोटं बोलून केवळ जनतेला लुटणे, मराठी भाषिकांच्या पाठीमागे एक आणि समोर एक अशी दुटप्पी भूमिका असणाऱ्या आमदारांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी मराठी भाषिकांना केले.
मराठी भाषिकांच्या पाठीशी आजवर सातत्याने केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच भक्कमपणे उभी राहिली आहे. विमानतळ असो, विधानसौध असो, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव असो, मराठी भाषिकांच्या रोजगाराचा प्रश्न असो अशा प्रत्येक बाबीत समितीनेच मराठी भाषिकांना साथ दिली आहे.
आगामी काळात समितीचे आमदार निवडून आल्यानंतर देखील मराठी भाषिकांच्या पाठीशी अशाच पद्धतीने समिती उभी राहील. शून्य टक्के भ्रष्टाचार, आमदारांसाठी येणारे मानधन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णांसाठी खर्च करण्याचा मानस असल्याचे आर. एम. चौगुले म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या नावाने मतांची भीक मागणाऱ्या आणि गरजेनुसार रंग आणि रूप बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.