पाण्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या प्यास फाउंडेशनतर्फे रायबाग तालुक्यातील नागरमुनोळी या गावांमध्ये सुमारे 15 लाख रुपये खर्चाचा जलाशय व पाणलोट क्षेत्र निर्मितीचा एक महत्त्वाकांक्षी अद्वितीय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
रायबाग तालुक्यातील नागरमुनोळी या गावची लोकसंख्या सुमारे 8000 असून त्या तुलनेत गावात गाई-गुरे अर्थात पशुधन देखील आहे. सदर गावाला गेल्या 2016 मध्ये दुष्काळाचा फटका बसला होता. त्यावेळी प्यास फाउंडेशनने या गावाला पाणीपुरवठा केला होता. सध्याच्या घडीला गावातील कुपनलिका जास्तीत जास्त 700 फूट खोलवर गेलेल्या आहेत.
प्यास आता या ठिकाणी असा प्रकल्प विकसित करत आहे ज्यामध्ये या गावातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडवून तलावाची निर्मिती केली जाईल. पाण्याचे पाणलोट क्षेत्र उपलब्ध होईल या पद्धतीने योग्य सोयीस्कर अशी खोदाई करून हा तलाव निर्माण केला जाईल.
या तलावामुळे सदर भागातील भू-जल वाढण्यासही मदत होणार असून या तलावामुळे जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचा स्त्रोत निर्माण होणार आहे.
सदर तलाव निर्मितीसाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च येणार असल्यामुळे यासाठी सहाय्य करू इच्छिणाऱ्यांचे प्यास फाउंडेशनकडून स्वागतच असणार आहे. प्यासचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे.