पाश्चात्य संस्कृती सोडून आपली मूळ भारतीय संस्कृती जी छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने अबाधित ठेवली, वृद्धिंगत केली त्याचे दर्शन शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत घडले पाहिजे. याबरोबरच मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य केले पाहिजे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे भान राखले पाहिजे, असे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी स्पष्ट केले.
बेळगावची ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणूक येत्या शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी आयोजित मध्यवर्तीय श्री शिवजयंती उत्सव महामंडळ, श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळ, शहरातील विविध श्री शिवजयंती उत्सव मंडळ या सर्वांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, पोलीस उपायुक्त टी. एस. शेखर आणि पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा हे उपस्थित होते. कोणत्याही महान व्यक्तीची जयंती असू दे त्या जयंती मधून अथवा जयंती मिरवणुकीतून संबंधित व्यक्तीचे महान कार्य लोकांसमोर आणले पाहिजे. त्याला जयंती म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वेळी ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी दिन दलितांच्या उद्धारासाठी, भारतीय संविधानासाठी जे कार्य केले ते दर्शविले जाते तसे शिवजयंती मिरवणुकीमध्ये छ. शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचे दर्शन घडविले गेले पाहिजे. छ. शिवाजी महाराजांशी संबंधित जी भारतीय संस्कृती आहे ती दाखविली गेली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती सोडून जी आपली मूळ संस्कृती आहे जी शिवाजी महाराज आणि त्यांच्या वारसांनी अबाधित ठेवली वृद्धिंगत केली त्याचे दर्शन चित्ररथ मिरवणुकीत झाले पाहिजे. तसे झाले तरच ती शिवजयंती मिरवणूक अतिशय अर्थपूर्ण होईल असे माझे वैयक्तिक मत आणि संशोधन आहे, असे पोलीस आयुक्त पुढे बोलताना म्हणाले.
थोडक्यात संस्कृतीवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. याबरोबरच पारंपारिक वाद्यांवर भर दिला गेला पाहिजे. तुम्ही सर्वजण येथेच लहानाचे मोठे झालात तेंव्हा तुम्हाला माहीतच असेल मात्र तरीही मी सांगतो की प्रचंड संख्येने लोक मध्यरात्री पहाटेपर्यंत बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित असतात. उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि गोवा येथील लोकांची ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी होत असते. तेंव्हा त्यांच्यासमोर शिवकालीन संस्कृतीचे चांगल्या प्रकारे प्रदर्शन घडले पाहिजे अशी माझी सर्वांना सूचना आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांमधील समन्वय ही होय. शिवजयंती मिरवणूक पुढे ढकलणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मध्यवर्तीय शिवजयंती उत्सव महामंडळाला शिवजयंती मिरवणूक पुढे ढकलण्याची विनंती केली आणि त्यांनी एकंदर परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. प्रशासन आणि महामंडळ यांच्यातील हा समन्वय आज फळाला येत आहे.
शिवजयंती मिरवणूक सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन करणे हे आहे. सर्वांनी सहकार्याने वेळेचे बंधन पाळले पाहिजे. तुम्हाला वाईट वाटेल परंतु मी सांगतो की गणपती विसर्जन मिरवणूक असू दे किंवा शिवजयंती मिरवणूक असू दे कांही मंडळे वेळेवर मिरवणुकीच्या ठिकाणी आपले चित्ररथ घेऊन हजर होत नाहीत. परिणामी त्याचे पर्यवसान मिरवणूक उशिरापर्यंत सुरू राहण्यात आणि सर्वांची गैरसोय होऊन मनस्ताप होण्यात होत असते. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आपापले चित्ररथ लवकरात लवकर मिरवणुकीच्या ठिकाणी आणावेत. जेणेकरून मिरवणूक सलग सुरळीत पार पडू शकेल, असेही पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी स्पष्ट केले.
सदर बैठकीस बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, विकास कलघटगी, शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, विजय जाधव आदींसह अन्य पदाधिकारी सदस्य तसेच शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विजय जाधव यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल माहिती दिली. जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन मध्यवर्तीय शिवजयंती उत्सव महामंडळ शिवजयंती चित्ररथ महामंडळ तसेच शहरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळ यांनी एकमेकात समन्वय राखून यावेळची शिवजयंती मिरवणूक चांगल्या प्रकारे सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याद्वारे भावी पिढीला नवा आदर्श घालून देण्याचे ठरविले असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला जातो. त्यांच्या रणनीतीचे धडे दिले जातात. मात्र आपल्या देशात दुर्दैवाने ते घडत नाही. शिवरायांनी मुसलमानांविरुद्ध लढाई केली नव्हती तर अधर्माच्या विरोधात धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला होता. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीमध्ये आम्ही जे देखावे सादर करतो ते मोगलांच्या अन्याया विरोधात असतात, मुसलमान बांधवांच्या विरोधात नसतात. तेंव्हा त्या देखाव्यांचा कोणी विपर्यास अथवा गैरसमज करून घेऊ नये असे स्पष्ट करून यावेळची श्री शिवाजी जयंती मिरवणूक शांततेत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन विजय जाधव यांनी केले.
शिवजयंती मिरवणुकी दरम्यान कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही अनुचित प्रकार घडल्यास कोणाचीही हयगय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. याखेरीज बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरून सुमारे 1200 हून अधिक पोलिसांना प्राचारण करण्यात येणार आहे. आजची बैठक पार पडल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शहरातील श्री शिवजयंती मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, विजय जाधव, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.