Saturday, December 21, 2024

/

अतिउत्साही कार्यकर्त्यांचा धिंगाणा! माजी नगरसेविकेच्या घरावर फोडले फटाके

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी १४४ कलम जारी करण्यात आला असूनही आज दक्षिण विधानसभा मतदार संघातील विजयी उमेदवाराच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आकसापोटी माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घराजवळील परिसरात फटाके फोडून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुधा भातकांडे यांनी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असून आपल्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

आज दुपारी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यात दक्षिण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार अभय पाटील विजयी ठरले असून, निकाल जाहीर झाल्यानंतर अभय पाटील समर्थकांनी घोषणाबाजी करत होसूर बसवाण गल्ली येथून मिरवणूक काढली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. या भागात राहणाऱ्या माजी नगरसेविका यांच्या घरासमोर येताच समर्थकांनी अतिउत्साहीपणा दाखवत सुधा भातकांडे यांच्या घराच्या अंगणात फटाके फोडत घोषणाबाजी केली. सुधा भातकांडे या समितीनिष्ठ असून त्यांच्यावर तिरकी नजर ठेवून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत सुधा भातकांडे यांच्या घरातील साहित्याचेही नुकसान झाले असून जमलेल्या अभय पाटील समर्थकांनी सुधा भातकांडे आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सुधा भातकांडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला असून याप्रकरणी अभय पाटील, भरत पाटील, विनायक काळेनट्टी, परशराम पेडणेकर, प्रवीण पिळणकर, जयंत जाधव, राहुल जाधव, जगन्नाथ पाटील, संदीप शहापूरकर, तानाजी शिंदे, नितीन जाधव, जुतू देवण, दीपक सोमनाचे, सुनील मुतकेकर, विनायक परशराम पाटील, प्रशांत धाकलूचे, सचिन बाळेकुंद्री, प्रशांत नाईक, रोहन हुंदरे, राहुल दुर्गाई, पप्पू सैणूचे, संदीप कोकितकर, अजय जाधव, योगेश पाटील आदींची नवे तक्रारीत नोंद करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.