बेळगाव लाईव्ह : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमानी फाट्यानजीक खासगी बस व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाला.
बाळाराम यादबा अर्जूनवाडकर (वय 60, रा. माणगाव, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. बसमधील दहाजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अपघात इतका भीषण होता की, मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. मृत अर्जूनवाडकर यांचा मृतदेह मोटारीत अडकला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत अर्जूनवाडकर आपल्या मोटारीने बेळगावमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकाला घरी आणण्यासाठी चालले होते. दरम्यान, कुद्रेमानी फाट्यानजीक कामगारांना घेऊन जाणाऱ्या खाजगी कंपनीच्या बसची आणि अर्जुनवाडकर यांच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली आणि यात अर्जूनवाडकर जागीच ठार झाले.
मोटारीच्या इंजिनच्या भाग चेपल्यामुळे तो चालकाच्या दिशेने दाबला गेला. यात अर्जूनवाडकर यांचा मृतदेह अडकला होता. स्टिअरिंग आदळून मृत अर्जुनवाडकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.
जोरदार धडकेमुळे बससुध्दा कडेच्या झाडावर जाऊन आदळली असून यात दहा कामगार किरकोळ जखमी झाल्याचे समजते. बस चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे ते सुरक्षीत राहिले. अर्जूनवाडकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.