माझे ज्येष्ठ बंधू माजी आमदार फिरोज शेठ यांनी बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला. सर्वांच्या मनात देशाबद्दलचे प्रेम कायम जागृत रहावे आणि प्रत्येकाने या ध्वजाला आदरपूर्वक नमन करावे हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच हा उत्तुंग राष्ट्रध्वज यापुढे कायम फडकत राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे बेळगाव उत्तर मतदार संघाचे नूतन आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी स्पष्ट केले.
शहरात आज मंगळवारी सकाळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार राजू सेठ यांनी प्रारंभी शहरातील पाणीटंचाईची समस्या निकालात काढण्यासाठी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पंपिंग करण्याबरोबरच शहरात पाणी समस्या निर्माण होऊ नये यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, माझे जेष्ठ बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदुस्थानातील सर्वात उत्तुंग तिरंगा ध्वज आपल्या बेळगाव शहरात फडकविण्याचा निर्णय घेतला आणि किल्ला तलावानजीक उंच ध्वजस्तंभ उभारून तो पूर्णत्वासही नेला. मात्र हे करताना त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र डगमगून न जाता त्यांनी सर्व अडचणींवर मात करत देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज आपल्या शहरात उभा केला.
हे करण्यामागचा त्यांचा उद्देश हा होता की आपल्याकडे गल्लोगल्ली कोणी निळा, कोणी हिरवा, कुणी भगवा असे ध्वज फडकाविले जातात. मात्र तिरंगा ध्वज खूप कमी लोक फडकवतात. अशा परिस्थितीत आपल्या देशाचा ध्वज इतका उंच फडकला पाहिजे की त्याचे दर्शन होण्याबरोबरच तो फडकतानाचा आवाज खाली सर्वांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. हा राष्ट्रध्वज फडकताना पाहून अबालविरुद्ध आनंदित झाले पाहिजेत. त्यांनी राष्ट्रध्वजाला छातीवर हात ठेवून आदराने नमन केले पाहिजे आणि आपल्या देशाच्या हितासाठी प्रार्थना केली पाहिजे. थोडक्यात हा राष्ट्रध्वज पाहून सर्वांच्या मनात देशाबद्दलचे प्रेम अधिक गहिरे व्हावे. माझ्या देशातील युवक -मुलं मग ती कोणत्याही जाती-धर्माची असोत त्यांचे देशावर प्रचंड प्रेम आहे. कोणताही युवक इतका मोठा नाही जो आपल्या देशावर प्रेम करत नाही. यासाठीच हा इतका उंच राष्ट्रध्वज उभारला आहे की दूर रस्त्यावरून जाताना किंवा विमानातून जाताना तो प्रत्येकाला दिसला पाहिजे आणि त्यांनी त्याला नमन केले पाहिजे, हे स्वप्न पाहून माझे बंधू माजी आमदार फिरोज शेठ यांनी हा राष्ट्रध्वज उभारला.
मात्र दुर्दैवाने आता हा राष्ट्रध्वज फक्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी फडकविला जातो. यासाठी मी विचार केला आहे आणि प्रशासनाला सल्ला दिला आहे की सदर राष्ट्रध्वज कायम फडकत राहिला पाहिजे. जेणेकरून राष्ट्राबद्दलचे प्रेम सतत जागृत राहण्याबरोबरच बेळगावकरांना या ध्वजाचा अभिमान वाटत राहील असे सांगून तांत्रिक बिघाड किंवा हवामान खराब असेल या गोष्टी वगळता हा राष्ट्रध्वज कायम फडकत राहील यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत असे आमदार राजू शेठ यांनी स्पष्ट केले.
कोरोना प्रादुर्भाव काळात केलेल्या कार्याबद्दल बोलताना मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य निस्वार्थ माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य होते. त्यावेळी आम्ही ठरवले होते की जाती-धर्म, भाषा भेद यासारखा कोणताही भेदभाव न करता कोविड सेंटरमध्ये दाखल करणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे, औषधांची व्यवस्था करणे वगैरे सर्व प्रकारची मदत समस्त जनतेला मिळवून देण्यासाठी कार्य करायचे आणि त्यानुसार आम्ही ते केले. भविष्यातही असे कार्य आम्ही माणुसकीसाठी करत राहणार आहोत. समाज हिताच्या कार्यांबरोबरच विकासाची कामेही असणार आहेत. ती देखील माझी जबाबदारी आहे. त्यामुळे समाज हित आणि विकास या दोन्ही जबाबदाऱ्या माझे बंधू फिरोज सेठ यांनी ज्या पद्धतीने समर्थपणे पार पाडल्या तशा मी देखील पार पाडणार आहे असा विश्वास आमदार सेठ यांनी व्यक्त केला.
जमीर अहमद यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी आहे. त्यावर तुमचे मत काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सतीश जारकिहोळी यांच्याकडे काँग्रेस मधील उत्तर कर्नाटकाचे नेतृत्व आहे. ते उपमुख्यमंत्री झाले पाहिजेत असे सांगून काँग्रेस हाय कमांडकडून मुख्यमंत्री निवडला जाईल आणि त्याबाबतीत हाय कमांडचा निर्णय आम्हा सर्व आमदारांना मान्य असेल असे आमदार सेठ यांनी नमूद केलं.