बेळगाव लाईव्ह : सकाळच्या सत्रानंतर हळूहळू मतदान केंद्रे गर्दीने गजबजत असून दुपारी १२ नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
सकाळी ७.३० – ८.०० च्या दरम्यान कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नोकरदार मंडळींनी काही काळ गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत मतदान केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आता दुपारच्या सत्रात हळूहळू गर्दी वाढत चालली असून मच्छे मतदार संघात दुपारी १२ नंतर मोठ्या प्रामाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मच्छे येथील मतदान केंद्रांवर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून मतदान केंद्रासमोर मतदारांची मोठी रांग पहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाला कौल दिला असून सकाळच्या सत्राच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाने बेळगाव जिल्ह्यात वेग पकडला असून मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात 20.42 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक 24. 36 टक्के मतदानाची नोंद कुडची मतदारसंघात झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आज सकाळी 9 वाजल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत झपाट्याने वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्राबाहेर स्त्री -पुरुष आणि युवा मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.
परिणामी बेळगाव उत्तर मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.15 टक्के इतके मतदान झाले होते, ते सकाळी 11 वाजेपर्यंत 11.47 टक्के इतके वाढले. बेळगाव दक्षिणमध्ये पहिल्या टप्प्यात 5.27 टक्के इतके असलेले मतदान सकाळी 11 वाजेपर्यंत 11.38 टक्के इतके झाले होते. बेळगाव ग्रामीणमध्ये देखील सकाळी पहिल्या टप्प्यात 6.38 टक्के असलेले मतदान 11 वाजेपर्यंत 19.7 टक्के इतके झाले होते. हीच परिस्थिती खानापूर मतदारसंघात देखील होती. या मतदारसंघात सकाळी पहिल्या टप्प्यात 7.15 टक्के इतके मतदान झाले होते, ते 11 वाजेपर्यंत 19.55 टक्के इतके वाढले होते. यमकनमर्डी मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.68 टक्के मतदानाची नोंद झाली होती ती सकाळी 11 वाजेपर्यंत 18.02 टक्के इतकी वाढली होती.
जिल्ह्यातील विविध 18 मतदार संघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आज सकाळी 11 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. निपाणी 21.5 टक्के, चिकोडी -सदलगा 15.3 टक्के, अथणी 24.05 टक्के, कागवाड 23.89 टक्के, कुडची 24.35 टक्के, रायबाग 23.5 टक्के, हुक्केरी 22.21 टक्के, अरभावी 19.56 टक्के, गोकाक 22.03 टक्के,यमकनमर्डी 18.02 टक्के, बेळगाव उत्तर 19.47 टक्के, बेळगाव दक्षिण 19.38 टक्के, बेळगाव ग्रामीण 19.7 टक्के, खानापूर 19.65 टक्के, कित्तूर 19.19 टक्के बैलहोंगल 19 टक्के, सौंदत्ती -यल्लमा 17.37 टक्के, रामदुर्ग 17.96 टक्के.