बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविलेल्या काँग्रेस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात बेळगावच्या आमदारांना स्थान देण्यात आले असून मंत्रिपदाची शपथ घेऊन बेळगावला परतल्यानंतर नूतन मंत्री महोदयांचे बेळगाव सांबरा रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सांबरा विमानतळावर आगमन होताच पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
पत्रकारांना उत्तर देताना सतीश जारकीहोळी यांनी आगामी काळात सर्वांना योग्य पदे दिली जातील असे सांगत आपल्या कार्यकाळात आपण अपूर्ण विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रतिक्रिया देताना, पूर्व प्राथमिक शिक्षणात मोठे बदल करण्याचा मानस असल्याचे बोलून दाखविले. यापूर्वी संबंधित विभागाची सर्वंकष माहिती जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
खातेवाटप अद्याप अधिकृतरीत्या झाले नसून सध्या ज्यांना ज्या ज्या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ती कार्यक्षमतेने हाताळली जाईल असे सांगत काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा मानस आहे असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प आणण्याचा आपला मानस असून यापूर्वीही यावर आपण चर्चा केली असून भविष्यात याबाबत आपण सर्व काही स्पष्ट करू असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्याला सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या माध्यमातून दोन मंत्रीपदे देण्यात आली असून सांबरा विमानतळावर मोठ्या संख्येने नव्या मंत्री महोदयांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते, समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुळेभावी येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
यावेळी चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार विश्वास वैद्य, माजी आमदार शाम घाटगे आदी उपस्थित होते.