क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील कीर्ती हॉटेलनजीक जुन्या पी. बी. रोडवर काल रविवारी रात्री घडली असून पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्या युवकाचे नाव नागराज भीमशी रागीपाटील (वय 28, रा. तारिहाळ) असे आहे. थोडक्यात माहिती अशी की, एक महिला दारूच्या नशेत हातात चाकू घेऊन निघाली होती. तेंव्हा मित्रासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या नागराजने थांबून तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तिने अचानक त्याला चाकूने भोसकले.
गंभीर जखमी नागराजाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता अतिरक्तस्त्रावामुळे उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.
मयत तरुणाचा भाऊ मलगौडा रागीपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने गवंडी असलेला नागराज यात्रेसाठी कऱ्हाडहून या गावी तारीहाळला आला होता. यात्रेनिमित्त रविवारी कपडे खरेदी करण्यासाठी तो बेळगावला आला होता. रागीपाटील कुटुंबीयांना काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास नागराजच्या खुनाची माहिती मिळाली. कांही चूक नसताना हकनाक आपल्या भावाचा खून झाला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मलगौडा यांनी केली आहे.
मयत नागराज आपला मित्र नागेंद्र कुकडोळी यांच्या समवेत कपडे खरेदी करण्यासाठी बेळगावला आला होता. खून झाला त्यावेळी ते दोघे एकत्र होते. प्रत्यक्षदर्शी नागेंद्र याने प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, गावची श्री रामेश्वर यात्रा असल्यामुळे आम्ही दोघे दुचाकीवरून कपडे व चप्पल खरेदी करण्यासाठी बेळगावला आलो होतो. खरेदी करून परत जात असताना कीर्ती हॉटेल जवळ रात्री 10:30 वाजता दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या एका महिलेने आम्हाला अडविले आणि माझा मोबाईल मला परत द्या असे म्हणून आरडाओरड सुरू केली.
ओळखपाळख नसल्यामुळे आम्ही कधी तुझा मोबाईल घेतला? असा प्रश्न मी केला. इतक्यात नागराज दुचाकीवरून उतरला त्यानेही त्या महिलेला तू कोण? कुठली? आम्ही तुला ओळखत नाही. तुझा मोबाईल कधी घेतला? अशी विचारणा केली. तेंव्हा त्या महिलेने अचानक साडी आड दडविलेला चाकू काढून नागराजच्या छातीत खूपसला. एवढ्यात तिथे गर्दी जमली. पोलिसांनी त्या महिलेला पकडले. दरम्यान आम्ही नागराला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो. मात्र अतिरक्त स्त्रावामुळे उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला, असे नागेंद्र याने सांगितले.
घटनास्थळी दाखल झालेल्या मार्केट पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले आहे. तिचे नांव जयश्री पवन पवार असे असून कंग्राळी खुर्द गावातील असल्याचे समजते. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.