बेळगाव लाईव्ह : निवडणुकीपेक्षाही चुरशीने आणि जल्लोषात झालेला निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा उद्या मंदावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची प्रचाराची मुदत सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वा. संपणार आहे. यानंतर कोणालाही प्रचार करता येणार नाही. मतदान केंद्राभोवती असणारे बॅनर, पत्रके काढून घ्यायची आहेत, अन्यथा निवडणूक आयोगातर्फे ते हटविण्यात येतील, उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मिळणार आहेत. त्यानंतर जाहीर प्रचार समाप्त होईल. मंगळवारी उमेदवार घरोघरी प्रचार करू शकतील. मात्र, जाहीर सभा, रॅली, बैठका घेता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला सोमवार, ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. बुधवारी १० मे रोजी मतदान आहे. त्यामुळे मतदान संपण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबला पाहिजे असा नियम निवडणूक आचारसंहितेत आहे. मतदान बुधवारी सायंकाळी ६ वाजता संपेल. त्याच्या ४८ तास आधी म्हणजेच सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होईल. आधी या मुदतीबाबत गोंधळ निर्माण झाला होता. जाहीर प्रचाराची सांगता रविवारीच होईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी मतदानाला सुरुवात होण्याच्या ४८ तास आधी अशी गणती करण्यात आली होती. मात्र सुधारित नियमानुसार मतदान सुरू होण्याच्या नव्हे, तर मतदान संपण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबला पाहिजे, असा निमय आहे.
पहिल्या टप्प्यात संथ असलेला प्रचार गेल्या चार दिवसांत शिगेला पोचला आहे. गेल्या चार
दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, येडियुराप्पा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदींच्या सभा झाल्या. तर रविवारी आणि सोमवारी केंद्रिय गृहमंत्री अमित
शहांचा बेळगावात रोड शो, निपाणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ जागांसाठी १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्नाटकच्या सोळाव्या विधानसभेसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे.