बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बेळगाव दौरा आखला होता. रविवारी सायंकाळी शिवचरित्र परिसरात आयोजिलेल्या भव्य जाहीर सभेत त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारांकडून होणाऱ्या दडपशाहीविरोधात आणि कमिशनराज विरोधात तोफ डागत मराठी माणूस आपल्या अस्मितेवरील आणि संस्कृतीवरील घाला कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षात दक्षिणेतील आमदारांकडून होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक याविरोधात सर्वसामान्य जनता येत्या १० मे रोजी चोख प्रत्त्युत्तर देतील, असे रोहित पवार म्हणाले.
मराठी माणूस कधीच दुसऱ्या भाषेच्या, स्थानिकांच्या, समाजाच्या विरोधात लढत नाही. मराठी माणूस केवळ आपल्या हक्कांसाठी आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आजवर लढत आला आहे. मराठी माणसाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. मात्र याच छत्रपती शिवाजी महाराजांवरून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी राजकारण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणूस हा राजकारणाचा विषय नसून शिवरायांचा अवमान कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवरायांचा बेंगळुरू मध्ये अवमान झाला, त्याविरोधात बेळगावमध्ये आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांविरोधात कारवाई करण्यात आली. ४५ दिवस तुरुंगात डांबण्यात आले. तर मग निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवरायांचा पुळका का? याच आमदारांच्या जागी आपल्या विचारांचा आमदार असता तर हा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडून याचा जाब विचारला असता. रस्त्यावर लढणं, आंदोलन करणं, आपले विचार व्यक्त करणं आणि आपल्या विचारांवर गदा येत असेल तर त्याविरोधात आवाज उठवण हे अधिकार घटनेने प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे याच अधिकारांतर्गत येत्या १० तारखेला आपलं उत्तर एकजुटीने द्यायचं आहे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.
रोहित पवार यांनी जाहीर व्यासपीठावरून दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याविरोधात तोफ डागली. गेल्या कित्येक वर्षात केवळ पैशाच्या जोरावर येथील जनतेवर दडपशाही करण्यात येत आहे. येथील आमदारांनी मतदार संघाचा नव्हे तर आपल्या घराचा विकास केला. या आमदारांनी जनतेची फसवणूक केली, कमिशनराज चालविले अशा आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर द्या, आणि लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना घरी बसवा, असे सडेतोड विचारही व्यक्त केले. कोरोना काळात कोणत्याही पदाविना रमाकांत कोंडुसकर हे तळागाळात कार्यरत राहिले, याउलट विद्यमान आमदारांनी घरात राहणे पसंत केले. हजारो कार्यकर्त्यांचा पाठिंबा असलेले रमाकांत कोंडुसकर हे अनवाणी पायाने प्रचार करत आहेत. सर्वसामान्य, सध्या आणि रांगडा गडी असे व्यक्तिमत्व असणाऱ्या कोंडुसकरांच्या प्रचारफेरीत पथदीप बंद करून अंधार करण्यात आला. मात्र रमाकांत कोंडुसकर यांना कार्यकर्त्यांचा तुफान पाठिंबा आहे. विद्यमान आमदारांप्रमाणे स्वतःचा विचार करणारे हे व्यक्तिमत्व नसून येथील आमदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराला ट्रकने दंडक द्यावी, असेही ते म्हणाले.
येथील आमदारांनी केवळ स्वार्थ साधला. तरुणांचे प्रश्न अर्धवट राहिले, बेरोजगारी, महत्वाचे प्रोजेक्ट्स इतर ठिकाणी हलविणे. दडपशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मालमत्ता, जमिनी लाटणे, निवडणुकीपुरताच मराठी माणसाचा वापर करणे असे कृत्य या आमदारांनी आजवर केले असून या आमदारांची भूमिकाच ‘डुप्लिकेट’ असल्याचे रोहित पवार म्हणाले.
आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला आपल्याच माणसाची गरज आहे. त्यामुळे आता ज्यापद्धतीने एकत्रित आणि संघटित झाला आहात त्याचप्रमाणे मतदानात देखील एकजूट दाखवा आणि पैशाच्या दडपशाहीखाली होत असणारे अन्याय मोडून काढा, असेही रोहित पवार यांनी सांगितले. रमाकांत कोंडुसकर यांच्यासह आर एम चौगुले, ऍड. अमर येळ्ळूरकर, मुरलीधर पाटील, मारुती नाईक या पाचही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, पैशासमोर दडपशाहीसमोर मराठीची ताकद मोठी हे दाखवून द्या, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.