बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची चाहूल लागताच सीमाभागातील मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांविरोधात शड्डू ठोकत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गोटात एकी व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना शहाणपण सुचले आणि महाराष्ट्र एकीकरण समिती हि संघटना पुन्हा जोडली गेली. हळूहळू राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहात गेलेल्या कार्यकर्त्यांनीही समितीकडे पाऊले वळवली असून समितीच्या एकीची नांदी सीमाभागातील चारही मतदार संघात विजयाच्या दिशेने घोडदौड करत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक सरकारकडून सातत्याने मराठी भाषिकांवर दडपशाहीचे अस्त्र उगारण्यात येते. अशातच कन्नड सक्ती आणि मराठी द्वेष या दोन गोष्टी अलीकडे मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचेही दिसून येत आहे. याशिवाय विधानसभेत कन्नडसक्ती विधेयकाचा प्रस्ताव देखील कर्नाटक सरकार मांडण्याच्या तयारीत असून आता मराठी भाषिक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीने जनमताचा कौल घेत प्रत्येक मतदार संघात अधिकृत आणि एकमेव उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहेत. दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, उत्तरमधून ऍड. अमर येळ्ळूरकर, ग्रामीण मधून आर. एम. चौगुले आणि खानापूर मधून मुरलीधर पाटील असे चार उमेदवार समितीने निवडणुकीत उतरवले असून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे.
राष्ट्रीय पक्षांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना हाताशी धरून करण्यात येत असलेल्या प्रचाराला प्रत्त्युत्तर म्हणून समितीने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रचारासाठी आमंत्रित केले. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोख शैलीत बेळगावमध्ये समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणानंतर समितीने जोरदार कमबॅक केल्याचे दिसून येत आहे.
सुरुवाती पासून दक्षिण विधानसभा मतदार संघातून सुरु झालेली समितीची लाट आता त्सुनामीत रूपांतरित होत असलेली पाहायला मिळत आहे. हि लाट हळूहळू सर्वत्र वेगाने पसरत चालली असून ग्रामीण, उत्तर, खानापूर आदी मतदार संघात समिती प्रवाहात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जोडले जात आहेत.
आजवर राष्ट्रोय पक्षांच्या नेत्यांनी मराठी जनतेचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी केला आहे. हि बाब आता मराठी भाषिकांच्या लक्षात आली असून मताच्या स्वरूपात आपली भाषा, अस्मिता, संस्कृती विकली जाणार नाही, याचे गांभीर्य जपत राष्ट्रीय पक्षांना तोंडावर दार आपटून नकार दर्शविण्यात येत आहे.
सीमाभागात महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारासाठी हजेरी लावली. मात्र या नेत्यांना सीमाभागातील मराठी जनतेची पोटतिडिक दर्शविण्यासाठी समिती कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्या सभेत विरोध केला आणि त्यानंतर प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावत समितीची ताकद कार्यकर्त्यांनी अधोरेखित केली आहे. ग्रामीण आणि दक्षिण मतदार संघातील बैठका सभा आणि पद यात्राना मोठी गर्दी वाढत आहेत.
समितीच्या कार्यकर्त्यांच्या स्वरूपात वाढत चाललेली कार्यकर्त्यांची लाट त्सुनामीत रूपांतरित होत असून विधानसभा निवडणुकीत हि लाट समितीच्या ऐतिहासिक विजयाची साक्षीदार बनेल, यात तिळमात्र शंका नाही.