महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, उत्तरचे ॲड. अमर येळ्ळूरकर आणि बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद मिळाला आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी बेळगावला आले असता त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा संपूर्ण पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना दिला आहे.
दरवर्षी दसऱ्याला नवरात्र उत्सव काळात शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात काढली जाते. या दौडमध्ये युवा पिढी हजारोच्या संख्येने सहभागी होत असते. आता भिडे गुरुजींच्या आशीर्वादामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तर मधील उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर आणि बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज शनिवारी सकाळी सोमवार पेठ टिळकवाडी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या घरी भिडे गुरुजी यांची भेट घेतली. यावेळी भिडे गुरुजी यांनी त्यांच्याशी निवडणुकी संदर्भात हितगुज साधून एकंदर परिस्थिती जाणून घेतली. तसेच कोंडुसकर, ॲड. येळ्ळूरकर आणि चौगुले यांच्यासह समितीच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत विजयी होण्याचा आशीर्वाद दिला.
याप्रसंगी किरण गावडे यांच्यासह नितीन धोंड, विश्वनाथ पाटील, परशुराम कोकितकर, अनंत चौगुले, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवराज पाटील, विनायक कोकितकर, गजानन निलजकर आदी उपस्थित होते.