बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारकांची मोठी वर्दळ सुरु आहे. एरव्ही महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात येण्यास मज्जाव करणाऱ्या कर्नाटकाने मराठी भाषिक मतदारांना लक्ष्य करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांसाठी पायघड्या घातल्या आहेत.
राष्ट्रीय पक्षांचे महाराष्ट्रातील विविध नेते सध्या सीमाभागात विविध ठिकाणी प्रचारासाठी हजर राहात असून बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू सेठ आणि निपाणीचे काकासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बेळगावमध्ये उपस्थिती दर्शविली.
यावेळी सीमाप्रश्नासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असल्याचे सांगत सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक भूमिका घेतली असून महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सीमावासियांच्या हितदृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सीमाप्रश्नाच्या कामकाजाबाबत दोन्ही राज्य आपापल्या बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील, आणि न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही राज्यांनी मान्य केला पाहिजे, सीमाप्रश्नी केंद्र सरकारची भूमिका महत्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याचप्रमाणे भाषिक हक्क जर कुणी डावलत असतील तर ती गोष्ट चुकीचीच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातील कन्नड भाषिक असोत किंवा कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिक, भाषिक अल्पसंख्यांक जिथे आहेत त्यांचे हक्क भाषिक हक्कानुसार मिळणे गरजेचे आहे. भाषिक मुद्द्यावरून कुणावरही अन्याय होणे योग्य नाही, सीमाप्रश्नी दोन्ही राज्यात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करायचे असल्यास कर्नाटकातील भाजप सरकार घालवावे लागेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.
यावेळी भाजप सरकारवर निशाणा साधत निवडणुकीच्या काळातच भाजपाला जनतेचा पुळका येतो, जेव्हा लोक संकटात असतात त्यावेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे का होत नाहीत? ऑपरेशन कमळ च्या माध्यमातून पैशांचे व्यवहार हे घोडेबाजाराप्रमाणे असल्याची टीका त्यांनी केली. कर्नाटकात राष्ट्रवादी कडून निवडणूक लढविण्यात येत आहे. याबाबत बोलताना त्यांनी, राष्ट्रवादीने निवडणूक लढविणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे सांगितले.
माजी मंत्र्यांच्या अंडी घोटाळ्यासंदर्भातही त्यांनी विशेष टिप्पणी करत जोवर मोदी पंतप्रधान असतील तोवर या गोष्टी अशाचपद्धतीने सुरु राहतील, २०२४ साली लोकसभा निवडणुकीत जनता या सर्व गोष्टींचे उत्तर देईल, आणि आगामी निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.