बेळगाव लाईव्ह : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वीज भरण्याची सुविधा गेल्या महिन्यापासून बंद झाली असून नागरिकांना हेस्कॉमच्या वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन तासनतास रांगा लावण्याची वेळ आली आहे.
वीजभारणा केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून उन्हाची लाही, वाहतुकीची समस्या, कामाचा ताण, वेळेचा अपव्यय अशा अडचणींचा सामनाही नागरिकांना करावा लागत असून तातडीने मोबाईल वॉलेटमधून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
ऑनलाईन किंवा मोबाईल वॉलेटमधून वीजबिल भरण्याची सुविधा मागील महिन्यापासून बंद आहे. या महिन्यात ही सुविधा पूर्ववत होईल, असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले होते. परंतु, अद्याप ही सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.
नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलमधून वीजबिल भरता येत असल्याने बिल भरण्यासाठी बिल भरणाकेंद्रांवर जाऊन तासनतास रांगा लावण्याची गरज भासत नव्हती. फोन पे, गुगल पे, भारत पे, पेटीएम यासारख्या ऍपमधून बिल भरणे सोयीचे ठरत होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून हेस्कॉमकडून ही सुविधा पुरविली जात होती.
यामुळे ऑनलाईन बिल भरणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली होती. एप्रिल महिन्यात हेस्कॉम व मोबाईल ऍप कंपन्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे हेस्कॉमने काही दिवसांसाठी ही सुविधा बंद केली. मोबाईलवरून बिल भरता येत नसल्यामुळे जवळील हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्र, त्याचबरोबर बेळगाव वन कार्यालयात जाऊन नागरिकांना बिल भरावे लागत होते. रेल्वेस्थानक, गोवावेस, शहापूर, खंजर गल्ली, नेहरुनगर येथील बिलभरणा केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. याचबरोबर बेळगाव वन कार्यालयातही बिल भरण्यासाठी गर्दी होत आहे.
हेस्कॉमचे रेल्वेस्थानक येथील कार्यालय, गोवावेस, शहापूर, धारवाड रोड, खंजर गल्ली, नेहरुनगर येथील बिलभरणा केंद्र, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर, अशोकनगर, गोवावेस, वडगाव येथील बेळगाव वन कार्यालये याचप्रमाणे ग्रामीण भागासाठी ग्राम पंचायत कार्यालय अशा ठिकाणी बिल भरून घेण्यात येत आहे.
हेस्कॉम प्रशासन व संबंधित मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असून पुढील महिन्यापासून ही सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हेस्कॉमची वेबसाईट, हेस्कॉमचे बिलभरणा केंद्र तसेच बेळगाव वनमध्ये बिल भरावे असे आवाहन करण्यात येत आहे.