बेळगाव लाईव्ह : २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. मात्र काही काळानंतर आलेल्या राजकीय भूकंपानंतर सत्तापालट होऊन भाजपने आपले सरकार स्थापन केले. बेळगाव जिल्ह्यात मात्र कोणाचेही सरकार असो नेहमीच जारकीहोळी परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळविले असून काँग्रेसचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची बेळगावच्या पालकमंत्रिपद वर्णी लागण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी ११ मतदार संघात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मागील निवडणुकीनंतर भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले होते. बेळगाव जिल्ह्यात कोणाचीही सत्ता असो वर्चस्व मात्र जारकीहोळी बंधुंचेच राहते हे आजवर सिद्ध झाले आहे. जारकीहोळी परिवारातील रमेश जारकीहोळी, लखन जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे बंधू भाजपमधून सक्रिय आहेत तर सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधून सक्रिय आहेत. आजवर बेळगाववर भाजपच्या कार्यकाळात रमेश जारकीहोळी आणि काँग्रेसच्या कार्यकाळात सतीश जारकीहोळी हे समीकरण सुरु आहे. सध्या कर्नाटकाच्या मुखयमंत्री निवडीची प्रक्रिया सुरु असून बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा कोणाच्या हाती येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सतीश जारकीहोळी यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. आजवर त्यांनी कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये तसेच सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात देखील मंत्रिपदाची धुरा संभाळली आहे. त्यामुळे आजपर्यंतचे राजकीय समीकरण पाहता बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सतीश जारकीहोळी यांच्याकडेच जाईल, अशीही चर्चा सुरु आहे.