कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणारी छ. शिवाजी महाराज यांची भारदस्त अश्वारूढ मूर्ती आज शुक्रवारी अपूर्व उत्साहासह मोठ्या जल्लोषात बेळगाव शहरातील ध. संभाजी चौकातून सवाद्य भव्य मिरवणुकीने कावळेवाडीला नेण्यात आली.
कावळेवाडी (ता. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या शिवमुर्तीची मिरवणूक आज शुक्रवारी बेळगाव शहरातून आयोजित करण्यात आली होती. शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथून भगव्या शिवमय वातावरणात या मिरवणुकीचा मोठ्या जल्लोषात प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी कावळेवाडी येथील युवक मंडळ महिला मंडळ तसेच समस्त नागरिक त्याचप्रमाणे शहरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीला चालना देण्यासाठी भाजप नेते माजी आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, युवा नेते माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे,भाजप नेते रवी पाटील,माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल ताशाच्या दणदणाटात निघालेल्या या मिरवणुकीतील हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी आणि भगवा कुर्ता परिधान केलेले कावळेवाडी येथील युवक, तसेच भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
या सर्वांमुळे ध. संभाजी चौक येथील वातावरण भगवेमय झाले होते. धर्मवीर संभाजी चौकातून निघालेली शिवरायांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक गणेशपुररोड मार्गे कावळेवाडीच्या दिशेने रवाना झाली.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, बेळगावातील उद्याच्या शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कावळेवाडी येथे स्थापन करण्यात येणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक आज धर्मवीर संभाजी चौकातून काढण्यात येत आहे हे विशेष आहे.
बेळगावचे विशेषतः म्हणजे संपूर्ण देशात जास्तीत जास्त शिवरायांच्या मूर्ती बेळगाव जिल्ह्यात आहेत. त्यातल्या त्यात बेळगाव शहर असे आहे की जेथे सर्वात मोठी ऐतिहासिक अशी शिवजयंती मिरवणूक काढली जाते. त्याचप्रमाणे शिवरायांचे अनुयायी आणि शिवभक्त देखील बहुसंख्येने याच ठिकाणी आढळतात. दुसरे वैशिष्ट्य हे की युवावर्ग दोन महिने सराव करून शिवजयंती मिरवणुकीमध्ये ज्वलंत देखावे सादर करत असतो. ही पूर्वापार परंपरा अन्यत्र कोठेही पहावयास मिळत नाही अशी माहिती देऊन कावळेवाडी गावकरी स्थापन करत असलेली शिवरायांची मूर्ती अतिशय भारदस्त देखणी आहे मूर्ती प्रतिष्ठानसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे बेळगावकरांना श्री शिवजयंती मिरवणुकी निमित्त हार्दिक शुभेच्छा, असे आमदार ॲड. बेनके म्हणाले. यावेळी माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे आणि माजी आमदार नंदीहळ्ळी यांनी देखील समायोजित प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मोहन मोरे यांनी हिंदुत्वाचे रक्षण आणि संवर्धनासाठी गावोगावी छ. शिवाजी महाराजांच्या मूर्ती उभारल्या गेल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. तसेच ज्या गावात शिवरायांची मूर्ती नाही तेथे ती बसविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. तेथील युवा वर्गाने आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले
दरम्यान, आज मिरवणुकीने नेण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचे भव्य सोहळ्याच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते येत्या 11 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रतिष्ठापना आणि उद्घाटन केले जाणार आहे. माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे यांच्या सौजन्याने हा सोहळा होणार आहे. मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, गोवा येथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री बसवराज बोंमइ, खासदार मंगला अंगडी, खासदार इराणा कडाडी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आमदार रमेश जारकीहोळी माजी आमदार ॲड. अनिल बेनके, श्रीराम हिंदुस्तानचे अध्यक्ष समिती नेते रमाकांत कोंडुसकर, धनंजय जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळ्यानंतर कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमही पार पडणार आहेत.