दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 जून 1986 सालच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्मा अभिवादन करण्याचा कार्यक्रम उद्या गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 1 जून रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने आचरणात आणतात.
यावर्षीही उद्या 1 जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 66 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक कर्नाटकाच्या जोखड्यात अडकून पडला आहे. तो आपल्या माय मराठी महाराष्ट्र राज्यात जाण्याकरता लोकशाही मार्गाने लढत आहे. या लढ्यातील एक भाग म्हणून 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलन झाले होते.
त्यामध्ये बेळगाव परिसरातील हुतात्मे झाले होते. त्यांना उद्या अभिवादन केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमास सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी,
महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी,महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ॲड. एम. जी पाटील यांनी केले आहे.