बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखलेल्या काँग्रेस पक्षाने आता लोकसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपून अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीतच पुढील निवडणुकीच्या दृष्टीने जगदीश शेट्टर यांच्या माध्यमातून तयारी सुरु केली आहे.
भाजपमधून उमेदवारी डावलल्यानंतर लक्ष्मण सवदी आणि जगदीश शेट्टर या दिग्गज मंडळींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीनंतर अथणी मतदार संघातून लक्ष्मण सवदी हे विजयी ठरले मात्र जगदीश शेट्टर यांना पराभव पत्करावा लागला.
यामुळे जगदीश शेट्टर यांच्याबाबत पक्ष आता कोणता निर्णय घेणार याची देखील उत्सुकता लागली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जगदीश शेट्टर प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी करतील कि विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळवून मंत्रीपदी विराजमान होतील याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
तिकीट हुकल्याने भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना त्यांचेच शिष्य महेश टेंगीनाकाई यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला. ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असल्याचे सांगणाऱ्या शेट्टर यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण केली.
हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून लढलेले आणि पराभूत झालेले जगदीश शेट्टर यांना काँग्रेस पुढच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उभे करण्यासाठी पडद्यामागची कसरत सुरू असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कर्नाटकातील भाजपच्या पराभवामागे भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष कारणीभूत असल्याचा थेट आरोप शेट्टर यांनी केला असून याच गोष्टीचे भांडवल काँग्रेसने राजकीय हत्यार म्हणून केले, तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत प्रल्हाद जोशी यांचे विरोधक म्हणून जगदीश शेट्टर यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.