बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरातील काही भाग वगळता अद्यापही वळिवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही.
गेल्या पंधरवड्यात सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण, गडगडाट ऐकू येत असूनही वळिवाच्या पावसाने मात्र दडीच मारली आहे. बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत चालली असून आज ३७.२ अंश सेल्सियस इतके तापमान नोंद झाले आहे.
बेळगाव आणि परिसरात मागील आठवड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून वाढत असलेल्या तापमानाने पुन्हा उच्चांक गाठला असून उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत.
बुधवारी तापमान ३७.२ अंश सेल्सियस वर पोहोचल्याने अंगाची लाही होत असल्याचे वातावरण आहे. रात्री काही अंशी हवेत गारवा जाणवत असला तरी दिवसभर वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे नागिरक हैराण झाले आहेत.