बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यास प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली. काँग्रेस सरकार बहुमतात आल्यानंतर अनेकठिकाणी वीजबिल वसुली अधिकाऱ्यांशी नागरिक हुज्जत घालताना दिसत असून काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लागलीच मोफत २०० युनिट वीज तर दूरच चक्क वाढीव दराचा झटका ग्राहकांना लागणार आहे.
१ जूनपासून वीजदरवाढ लागू होणार असून हेस्कॉम, बेस्कॉम आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत दर वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रति युनिट वाढवल्या जाणाऱ्या दराबाबत १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांकडून आक्षेप मागवून घेतले होते. तसेच आक्षेप नोंदविताना ग्राहकांनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विजेच्या दरात वाढ करू नये अशी मागणी केली होती. मात्र वीज कंपन्यानी केलेल्या मागणीनुसार केईआरसीने सुधारित वीज दर लागू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार १ जूनपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत.
प्रति युनिट एक ते दीड रुपयांपर्यंत दर वाढवून द्यावा, अशी मागणी हेस्कॉमसह इतर कंपन्यानी केईआरसीकडे केली होती. मात्र, दर किती प्रमाणात वाढविण्यात येणार आहे याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नसून, आठ दिवसात सुधारित दर जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती दिली.
वीज कंपन्यांकडून दरवर्षी वीज दरवाढ केली जात असल्याने ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी ६० ते ७० पैशांची प्रतियुनिट मागे दरवाढ होत असल्याने वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे.